हिंगोली शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असून, हिंगोली शहर स्वच्छ व सुंदर शहर ही संकल्पना राबविली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष रेखा श्रीराम बांगर यांनी गुरुवारी ता २५ दिली.
.
हिंगोली पालिकेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार त्यांनी आज स्वीकारला. यावेळी आमदार संतोष बांगर, ॲड मनीष साकळे, युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम, नगरसेवक श्रीराम बांगर, ॲड अविनाश बांगर, अनिल नैनवाणी यांच्यासह शिंदेसेनेचे नगरसेवक, पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा बांगर व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला
यावेळी हिंगोली पालिकेचा पदभार घेतल्यानंतर बोलताना नगराध्यक्ष रेखा बांगर म्हणाल्या की, आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहराच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हिंगोली शहरातील पाणी प्रश्न महत्त्वाचा असून सर्व प्रभागांना नियमितपणे पाणीपुरवठा होण्यासाठी योग्य नियोजन केले जाईल. त्यासाठी वेळप्रसंगी नवीन जलकुंभ उभारणीचे काम हाती घेतली जाईल. तसेच नवीन वसाहतीमध्ये जलवाहिन्या टाकल्या जातील. यातून नवीन वसाहतीला पाणीपुरवठा केला जाणार आहे. याशिवाय शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे सर्व प्रभागातील ओला व सुका कचरा घंटागाड्यांच्या माध्यमातून एकत्रित करून डम्पिंग ग्राउंड वर कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती केली जाणार आहे. या खताचा वापर शहरातील नवीन वसाहती मोकळे मैदान या ठिकाणी लावल्या जाणाऱ्या झाडांसाठी केला जाणार आहे.
शहरातील भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून सांडपाणी व्यवस्थापन केले जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात नाल्या तुंबण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. शहरातील सर्व प्रभागांमध्ये रस्ते, पिण्याचे पाण्याची व्यवस्था, पथदिवे यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व नगरसेवक व पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातून प्रयत्न केले जाणार आहे. नागरिकांनीही त्यांचे प्रश्न पालिका प्रशासनाकडे कळविल्यानंतर तातडीने या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचे प्रयत्न आहेत.
हिंगोली शहर स्वच्छ व सुंदर शहर ही संकल्पना आगामी काळात राबविली जाणार असून या संकल्पनेसाठी नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षा बांगर यांनी केले.






















