आदिवासी विकास महामंडळातर्फे शेतकरी नोंदणीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली असली तरी हरसूल येथील ऑनलाइन नोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. गेल्या आठवड्यापासून सकाळपासून सायंकाळपर्यंत नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा कायम असल्याचे चित्
.
शासनामार्फत शेतमालाला हमीभाव तसेच त्यावर बोनस दिला जात असल्यामुळे शेतमाल बाजारात आणण्यापूर्वी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र, वेळेवर नोंदणी होत नसल्याने शेतकऱ्यांचे हंगामी नियोजन बिघडत असून याचा थेट फटका त्यांना सहन करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना नोंदणीसाठी अद्याप फोन किंवा संदेश प्राप्त न झाल्याने ते स्वतः नोंदणी केंद्रावर येत आहेत. परिणामी केंद्रावर प्रचंड गर्दी होत असून व्यवस्थेवर ताण वाढला आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या अपुऱ्या नियोजनामुळे काही शेतकऱ्यांचे सलग दोन ते तीन दिवस वाया जात असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून नोंदणी प्रक्रियेत तातडीने सुधारणा करावी आणि अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. २२ नोव्हेंबर रोजी अर्ज करूनही ऑनलाइन नोंदणीसाठी फोन आला नाही. नोंदणीची मुदत संपत असल्याने आम्ही स्वतःहून अर्ज घेऊन रांगेत उभे होतो. तिसऱ्या दिवशी ऑनलाइन अर्ज नोंदणी झाली. शेतकऱ्यांना नोंदणी करताना मोठी अडचण सहन करावी लागत असल्याने प्रशासनाने कारभार सुधारण्याची अपेक्षा आहे. – नामदेव भोये, शेतकरी
रेंज व आधार अपडेट नसल्याने अडचणी हरसूल आणि ओझरखेड या दोन्ही केंद्रांची नोंदणी प्रक्रिया एकाच ठिकाणाहून चालत असून या केंद्रांअंतर्गत तब्बल ५८ गावांचा समावेश आहे. त्यामुळे एका केंद्रावरच मोठा ताण येत आहे. अनेक शेतकऱ्यांना मोबाइल रेंज नसणे किंवा अन्य कारणांमुळे नोंदणीसंदर्भातील फोन किंवा संदेश वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे बुकिंग नसतानाही शेतकरी थेट केंद्रावर येत असल्याने गर्दी वाढत आहे. यापूर्वी केवळ ॲपवर अंगठा घेऊन नोंदणी केली जात होती. मात्र नव्या नियमानुसार शेतकऱ्यांच्या डोळ्यांचे स्कॅनिंग बंधनकारक करण्यात आल्याने प्रक्रियेला अधिक वेळ लागत आहे. याशिवाय सकाळपासून रांगेत उभे राहिल्यानंतर दुपारी नंबर आल्यावर आधार कार्ड अपडेट नसल्याने अनेक नोंदणी होत नाही. रांगेत उभे असतानाही ऐनवेळी ओळखीच्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात असल्याच्या तक्रारीही येत आहेत.
दोन केंद्राचा भार एकाच केंद्रावर हरसूल व ओझरखेड या दोन केंद्राची नोंदणी हरसूल केंद्रात करतो. या दोन्ही केंद्रात ५८ गावांतील शेतकरी येतात. त्यासाठी १४० शेतकऱ्यांना फोनद्वारे नोंदणीसाठी बोलावले जाते. पहिले प्राधान्य त्या शेतकऱ्यांना दिले जाते. त्यानंतर नोंदणी अर्ज पूर्ण भरलेला असला तर त्यांची नोंदणी केली जाते. परंतु त्या शेतकऱ्यांसोबत गावातील इतरही शेतकरी नोंदणीसाठी रांगेत उभे राहतात त्यामुळे गर्दी होते. – विजय भागवत, गोडाऊन कीपर, हरसूल
रांगेत उभे राहूनही वेळेत काम होत नाही एक महिन्यांपूर्वी शेतकरी नोंदणी अर्ज केला होता. आज ऑनलाइन नोंदणीसाठी भाकरी घेऊन सकाळी रांगेत आलो होतो. दुपारी तीन वाजता नंबर आल्यावर यादीत नाव आल्याचे कळाले. त्यामुळे सलग दोन दिवस वाया गेले. – शंकर माळगावे, शेतकरी






















