महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान; १६ ला निकाल
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा अखेर उडाला असून, मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये महानगरपालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने एकाच टप्प्यात २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, तर १६ जानेवारीला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
राज्यात मुदत संपलेल्या २७ महानगरपालिकांसह जालना आणि इचलकरंजी या दोन नवनिर्मित महानगरपालिकांचा या निवडणुकांत समावेश आहे. एकूण २,८६९ जागांसाठी ही निवडणूक होणार असून, त्यात महिलांसाठी १,४४२ जागा राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी ३४१, अनुसूचित जमातींसाठी ७७, तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ७५९ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
निवडणूक कार्यक्रम असा असेल :
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा कालावधी : २३ ते ३० डिसेंबर २०२५
अर्जांची छाननी : ३१ डिसेंबर २०२५
उमेदवारी माघार : २ जानेवारी २०२६
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी : ३ जानेवारी २०२६
मतदान : १५ जानेवारी २०२६
मतमोजणी : १६ जानेवारी २०२६
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील २९ मनपासाठी एकाच दिवशी मतदान होणार असून यापैकी मुंबईत एक सदस्यीय, तर २८ मनपात बहुदस्यीय प्रणाली लागू असणार आहे. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ची मतदार यादी वापरली जाणार असल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय दुबार मतदारांच्या घऱी जाऊन व्हेरिफिकेशन करण्यात आलं आहे. त्यांच्याक त्यांच्याकडून हमीपत्र घेण्यात आलं आहे. त्यांच्या नावासमोर २ स्टार लावण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
मनपा निवडणुकीसाठी २९० निवडणूक निर्णय अधिकारी, ८७० सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, १ लाख ९६ हजार ६०५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं आयोगानं सांगितलं आहे. तसेच स्टार प्रचारकांची संख्या २० वरून ४० करण्याची माहिती ही आयोगने दिली आहे. राज्यात एकून २९ मनपासाठी निवडणूक होणार असून २८६९ जागांसाठी मतदान होणार आहे. यापैकी १४४२ महिला, ३४१ एससी, ७७ एसटी जागांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी आयोगाने खर्चााची मर्यादाही निश्चित केली आहे. त्यानुसार, अ वर्ग मनपासाठी १५ लाख रुपये, ब वर्ग मनपासाठी १३ लाख, क वर्ग मनपासाठी ११ लाख, तर ड वर्ग मनपासाठी ९ लाख इतका असणार आहे. आजपासून मनपा निवडणूक क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या निवडणुका सध्या लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे नियोजन असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही जानेवारीअखेरपूर्वी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महानगरपालिका निवडणुकांच्या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, सर्वच पक्षांकडून तयारीला वेग आला आहे.
























