छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेत गुलमंडी वॉर्डातील उमेदवारीवरून आजी-माजी आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आमदार प्रदीप जैस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी आपापल्या मुलांसाठी या वॉर्डातून उमेदवारी या वादावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हे पक्षाचे अंतर्गत प्रश्न असून ते लवकरच सोडवले जातील.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेनेमध्ये अनेक गट आणि अंतर्गत वाद दिसून येत आहेत. पक्षाच्या प्रचार कार्यालयात नुकतीच एक बैठक घेण्यात आली, जिथे उमेदवारी अर्ज भरून घेण्यात आले. त्यानंतर इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे नियोजन आहे.
या संदर्भात आमदार प्रदीप जैस्वाल यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, किशनचंद तनवाणी आणि मी गेल्या ४० वर्षांपासून मित्र आहोत. पक्ष जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल.
तर माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनीही आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, माझा भाऊ गुलमंडी वॉर्डातून नगरसेवक म्हणून निवडून आला होता आणि माझा मुलगा को-ऑप्टेड सदस्य होता. त्यामुळे या वॉर्डातून माझ्या भावाला किंवा मुलाला उमेदवारी मिळावी, असा माझा आग्रह आहे. मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या वादाला फारसे गंभीर मानले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये असे किरकोळ वाद होत असतात. पक्षाचा जो आदेश असेल, तो सर्वांना मान्य असेल आणि यात कोणताही मोठा वाद नाही, असे शिरसाट यांनी पुन्हा स्पष्ट केले. गुलमंडी वॉर्डातील उमेदवारीकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, पक्षश्रेष्ठींच्या अंतिम निर्णयाची राजकीय वर्तुळात प्रतीक्षा आहे.






















