अक्षर क्रांती फाऊंडेशनने जाहीर केलेल्या प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांमध्ये यावर्षी तीन कवितासंग्रहांना सन्मानित करण्यात आले आहे. यात अमरावतीच्या डॉ. मंदा नांदुरकर यांच्या ‘फुलकई’ या बालकवितासंग्रहाचा समावेश आहे. या पुरस्कारांचे वितरण २७ डिसेंबर रोजी
.
डॉ. मंदा नांदुरकर यांच्या ‘फुलकई’ या बालकवितासंग्रहासह अकोल्याचे कवी दिनेश गावंडे यांच्या ‘लख्ख कंदीलाच्या उजेडात’ आणि नाशिकचे कवी किरण भावसार (सिन्नर) यांच्या ‘घामाचे संदर्भ’ या कवितासंग्रहांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अक्षरक्रांती साहित्य पुरस्कार दरवर्षी दर्जेदार कवितासंग्रहांना दिला जातो. कोरोनामुळे वितरण थांबल्याने, जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२४ पर्यंत प्रकाशित झालेले सुमारे २५० कवितासंग्रह या पुरस्कारासाठी मागवण्यात आले होते. त्यातून या तीन कवितासंग्रहांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र शासन अनुदानित दोन दिवसीय ‘अक्षरक्रांती जिल्हा साहित्य महोत्सवा’चा भाग आहे.
हा महोत्सव महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग, नागपूर येथील सभागृहात सकाळी १० वाजता सुरू होईल. अक्षरक्रांती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शंकर घोरसे आणि कला गौरव संस्थेच्या अध्यक्ष डॉ. संगीता बानाईत यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ साहित्यिक वसंत वाहोकर महोत्सवाचे अध्यक्ष असतील, तर वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील.
विदर्भ साहित्य संघांचे अध्यक्ष प्रदीप दाते यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य पत्रकार श्रीपाद अपराजित, माजी संमेलनाध्यक्ष सुरेश पाचकवडे आणि जपानमधील प्रसिद्ध कादंबरीकार उर्मिला देवेन टोकियो उपस्थित राहणार आहेत. समारोपीय सत्राचे अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य मंडळाचे सदस्य डॉ. गजानन नारे असतील. तसेच, डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ. तीर्थराज कापगते, अशोक मानकर आणि अबुधाबी येथील प्रसिद्ध कवी मनोज भारशंकर यांचीही प्रमुख उपस्थिती असेल.
अक्षरक्रांती फाऊंडेशनतर्फे सध्या केवळ उत्कृष्ट कवितासंग्रहांना पुरस्कार दिला जातो. परंतु, पुढील वर्षापासून कविता संग्रहांसोबतच इतर साहित्य प्रकारांनाही पुरस्कार योजनेत समाविष्ट करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे आयोजकांनी कळवले आहे. सध्या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ असे आहे.






















