पर्यावरण प्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी गुरूवारी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. त्यात त्यांनी साधूसंतांना तरी तपोवनातील झाडे तोडणे चालेल का? असा खडा सवाल केला आहे.
.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल तपोवनातील वृक्षतोडीवर आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावेळी त्यांनी वृक्षांचे पुनर्रोपण करण्यावर भर दिला होता. तसेच पर्यावरणवाद्यांवरही निशाणाही साधला होता. या पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे यांनी आज पुन्हा नाशिक येथील वृक्षतोडीवर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच वृक्षतोड साधूसंतांनाही चालणार नाही असे ठणकावून सांगितले. ते म्हणाले, 10 वर्षांच्या आतील झाडे तोडण्याची व त्या बदल्यात दुसरी झाडे लावण्याची कल्पनाच मुळात चुकीची आहे. म्हणजे पोरांना मारायचे आणि आई-बापाला जिवंत ठेवायचे. प्रत्यक्षात त्यांचे उरलेले वय किती आहे? हे बघायचेच नाही.
वृक्ष आपले आई-वडील
झाडे तोडून दुसरीकडे कुठेतरी 10 झाडे लावायची ही कल्पना मला पटत नाही. वृक्ष हे आपले आई-वडील आहेत. आपण जगतो ते केवळ झाडांमुळे. आपल्या आई-वडिलांवर कुणी हल्ला केला तर आपण गप्प बसणार का? महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला माझा सवाल आहे. आम्ही कोणत्याही साधूसंतांचा अवमान करू शकत नाही. पण अशी झाडे तोडणे हे साधूसंतांना तरी पटेल का? ऋषीमुनी झाडाखालीच बसून तपश्चर्या करत होते, असे सयाजी शिंदे म्हणाले.
पत्रकारांनी यावेळी सयाजी शिंदेंना मंत्री नीतेश राणे यांनी केलेल्या टीकेविषयी प्रश्न केला. त्यावर त्यांनी आपल्याला त्यावर बोलायचे नाही, असे स्पष्ट केले. आपल्यासाठी झाडे महत्त्वाची आहेत आणि ती जगली पाहिजेत, असे ते म्हणाले. दरम्यान, तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता राजकीय नेते, सिनेसृष्टीतील कलावंतही आवाज उठवत आहेत.
आत्ता पाहू काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी या प्रकरणी विनाकारण राजकारण करणाऱ्यांचाही समाचार घेतला. कुंभमेळा आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. त्याचवेळी पर्यावरणही महत्त्वाचे आहेत. झाडेही महत्त्वाची आहेत. आमच्यापैकी कुणाचेही मत नाही की, अशा पद्धतीने झाडे तोडली गेली पाहिजेत. पण या प्रकरणी काही लोकांनी विनाकारण अॅक्टिव्हिझम सुरू केले आहे. मला पर्यावरणवाद्यांचा आदर आहे. पण काही लोकं राजकीय कारणांनी पर्यावरणवादी बनलेत.
त्यांना माझे एवढेच म्हणणे आहे की, कुंभमेळा हा निसर्गाशीच साधर्म्य साधणाराच आपल्या संस्कृतीचे एक प्रतिक आहे. त्यामु्ळे यातून आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की, ज्यातून पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही. पण काही लोकांना कुंभमेळ्यात अडथळेच यावेत असे वाटते. अशा लोकांना सांगतो की, सरकार अडथळे येऊ देणार नाही, असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले होते.






















