संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नांदेडमधील सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. “सक्षम दलित असल्यानेच माझ्या घरच्यांनी त्याची हत्या केली. इतकेच नव्हे, तर ‘ज्याच्याशी तुमचे मॅटर आहे, त्याला आधी मारा आणि मगच प
.
नांदेडमधील 19 वर्षीय सक्षम ताटे याचे आंचल मामीडवार हिच्यावर प्रेम होते. आंतरजातीय प्रेमसंबंध असल्याने मुलीच्या घरच्यांचा याला विरोध होता. मुलीच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमला गाठून आधी गोळी झाडली आणि नंतर दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी प्रतिकात्मक लग्न करत, आयुष्यभर त्याच्या आठवणीत आणि त्याच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. आज एका वृत्तसंस्थेशी बोलताना आंचलने आपल्या वेदनांना वाट मोकळी करून दिली.
नेमके काय म्हणाली आंचल?
आंचल म्हणाली, “आम्ही गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होतो. पण सक्षम ‘जय भीम’ (दलित) असल्याने माझ्या घरच्यांचा त्याला तीव्र विरोध होता. ‘आपण हिंदू आहोत आणि तो दलित आहे’, असे सांगत त्यांनी हे नाते नाकारले होते. सक्षमने माझ्यासाठी हिंदू धर्म स्वीकारण्याची तयारीही दर्शवली होती. माझे वडील आमचे लग्न लावून देणार, असे खोटे सांगत होते. पण प्रत्यक्षात ते सक्षमला संपवण्याची संधीच शोधत होते.”
आंचलचे पोलिसांवर गंभीर आरोप
या प्रकरणात आंचलने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ती म्हणाली, “ज्या दिवशी सक्षमची हत्या झाली तेव्हा माझा लहान भाऊ हिमेश मला पोलिस ठाण्यात घेऊन गेला होता. सक्षमच्या विरोधात केस कर असं त्याने मला सांगितलं. मी तसं करायला नकार दिला. तिथे तीन ते चार पोलिस होते ते म्हणाले की ज्याच्याशी तुझं मॅटर आहे त्यालाच मार. त्याला मार आणि मग आमच्याकडे ये. त्यानंतर माझा लहान भाऊ त्यांना म्हणाला की ठीक आहे त्याला मारुनच मी तुमच्याकडे येईन. ते पोलिस आमच्या घरी पैसे घ्यायला यायचे,” असा गंभीर आरोप आंचलने केलाय.
पेपर वाचून कळले, माझा सक्षम गेला…
हत्येच्या दिवसाचा घटनाक्रम सांगताना आंचलला रडू कोसळले. “सक्षम त्याच्या आत्याला सोडण्यासाठी स्टेशनवर गेला होता, तेव्हाच त्याला गाठून त्याची हत्या करण्यात आली. मला या कटाची काहीच कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी वर्तमानपत्र वाचले, तेव्हा मला समजले की सक्षमची हत्या झाली आहे. घरच्यांनी माझ्यापासून हे सत्य लपवून ठेवले होते,” असे तिने सांगितले. ”सक्षम माझ्या वडिलांचा खूप आदर करायचा. आम्हाला दोघांनाही माझ्या वडिलांनी सांगितले होते की तुमचे लग्न लावून देऊ. पण त्यांनी सक्षमला ठार मारले,” असा आरोप आंचलने केला.
आंचलला माझा मुलगा मानेल – सक्षमची आई
दरम्यान, या प्रकरणावर सक्षमची आई संगीता ताटे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सक्षमच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी आंचल मला पोलिस स्टेशनमध्ये भेटली. ती खूप रडत होती आणि माझ्याबरोबरच ती घरी आली. माझ्या गळ्यात पडून ती रडली आणि म्हणाली की मी तुमच्याच घरी राहीन. त्या दिवशी मी तिला माझ्या घरी घेऊन आले, असे सक्षमची आई म्हणाली.
जसे मी माझ्या मुलावर प्रेम केले, तसेच प्रेम मी आंचलवरही करीन. तिला मुलगी न मानता, सक्षमप्रमाणेच माझा मुलगा मानेल. तिच्यात मला सक्षम दिसतो. मी तिच्यावर माझ्या स्वतःच्या लेकीसारखे प्रेम करेन. जोपर्यंत माझा जीव आहे, तोपर्यंत मी तिच्यावर प्रेम करत राहीन. तिने माझी साथ सोडली नाही, तर मी देखील तिची साथ आयुष्यभर सोडणार नाही. माझी एकच मागणी आहे की, माझ्या मुलाला न्याय मिळावा,” असे संगीता ताटे यांनी म्हटले आहे.






















