स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. ” ‘राष्ट्रप्रथम’ नाही तर ‘भ्रष्टप्रथम’ आणि ‘मुस्लिम खतम’ हेच भ
.
सध्या राज्यातील बहुतांश नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस पडत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही ठिकाणी मताला 1 हजार तर काही ठिकाणी 2 हजार रुपयांचा भाव फुटल्याच्या वावड्या उठल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रचार थांबल्यानंतर रात्रीच्या वेळी ‘लक्ष्मीदर्शन’ होणार असल्याचे सूचक विधान केले होते. त्यातच आता अब्दुल सत्तार यांनी उघडपणे विरोधकांचे पैसे घेण्याचा सल्ला दिला. तर आता उत्तम जानकर यांनी आकडाच जाहीर केला आहे.
नेमके काय म्हणाले उत्तम जाणकर?
उत्तम जानकर यांनी एका प्रचारसभेत बोलताना भाजपच्या बदललेल्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ”सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने तब्बल 300 कोटी रुपये पाठवले आहेत. प्रत्येक नगरपालिकेला किमान 25 कोटी रुपये वाटपासाठी आले असून, भाजप हा सध्याचा सर्वात भ्रष्ट पक्ष बनला आहे.”
वाजपेयींच्या भाजपची गटारगंगा झाली
“मी स्वतः 30 वर्षे भाजपमध्ये होतो. तेव्हा अटलबिहारी वाजपेयींच्या काळात ‘राष्ट्रप्रथम’ हे पक्षाचे ब्रीदवाक्य होते. मात्र, आताच्या भाजपमध्ये भ्रष्ट लोकांची भरती झाल्याने पक्षाची ‘गटारगंगा’ झाली आहे. आता ‘भ्रष्टप्रथम आणि मुस्लिम खतम’ हेच भाजपचे नवीन स्लोगन बनले आहे. तत्त्वशून्य राजकारण आणि केवळ भ्रष्टाचार, या एकाच मुद्द्यावर हे सर्व एकत्र आले आहेत,” असा आरोपही आमदार उत्तम जानकर यांनी केला.
पालकमंत्री गोरेंवरही साधला निशाणा
यावेळी जानकर यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरही निशाणा साधला. जिथे भाजप चौथ्या क्रमांकावर आहे, तिथे ‘कोणाचेही पैसे घ्या, पण मत आम्हाला द्या’, अशी लाचारीची भाषा पालकमंत्री वापरत आहेत, अशी टीका त्यांनी केली. सध्या राज्यात तीन पक्ष्यांच्या सरकारचे जे चित्र आहे ते फार काळ टिकणारे नाही, यातून लवकरच मोठा स्फोट झालेला दिसेल असा दावाही आमदार जानकर यांनी केला आहे.






















