भद्रावती नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना मतदारांच्या, विशेषतः महिलांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले आहे. गवराळा भागात प्रचारासाठी गेलेल्या धानोरकर यांना स्थानिक महिलांनी विकास
.
भद्रावती नगरपालिकेचे राजकारण गेल्या 15 वर्षांपासून हाताळणारे अनिल धानोरकर हे भाजपच्या तिकीटावर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांचे ते दीर आहेत. रात्रीच्या वेळी ते गवराळा गावात प्रचारासाठी पोहोचले असता, तेथील महिलांनी त्यांना घेरले आणि प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल धानोरकर येथील गवराळा प्रभागात मतदारांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी महिलांनी त्यांची चांगलीच शाळा घेतली. निवडणूक आली की सर्वच आश्वासन देतात. मग पाच वर्षे कुणी ढुंकून बघत नाही, नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून प्रभागातील काम करुन घ्यायचा दम नाही तर कशाला उभे राहते असा थेट प्रश्नही महिलांनी यावेळी केला. जसे मालेगावला विषारी दारु पिल्याने घडले तशी घटना भद्रावतीत घडायला वेळ लागणार नाही असेही महिला म्हणाल्या.
दारूमुळे संसार उद्ध्वस्त
परिसरातील दारू दुकानांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याची तक्रार महिलांनी केली. विशेष म्हणजे, संबंधित दारू दुकानाचे मालक तुम्हीच आहात, त्यामुळे दारूमुळे तरुण पिढी बिघडत असताना आम्ही तक्रार कोणाकडे करायची? असा थेट सवाल महिलांनी विचारला. यावेळी महिलांनी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीवरून ही धानोरकर यांना जाब विचारला.
विकासाचा अभाव
एका ज्येष्ठ महिलेने संताप व्यक्त करताना सांगितले की, गेल्या 40 वर्षांपूर्वी लग्न करून या भागात आले, तेव्हापासून हा वॉर्ड तसाच आहे. गेल्या 15 वर्षात तुम्ही सत्तेत असूनही इथे रस्ते झाले नाहीत की गट्टू बसवले नाहीत. नाल्या आणि गटारी तुंबलेल्या अवस्थेत आहेत.
प्रचारातून घेतला काढता पाय
महिलांचा आक्रमक पवित्रा आणि प्रश्नांचा भडिमार पाहून अनिल धानोरकर निरुत्तर झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच आणि प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता येत नसल्याने त्यांनी अखेर तिथून काढता पाय घेतला. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजप उमेदवाराला मतदारांनी अशा प्रकारे पिटाळून लावल्याने चर्चा सुरू झाली आहे. उद्या 29 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर सभा आहे. त्याचे काय होणार असाही प्रश्न आता केला जात आहे.






















