ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सुविधा मिळेल याकडे लक्ष देऊन रुग्णांची हेळसांड होऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी मंगळवारी ता. 25 दिल्या आहेत.
.
जिल्हा परिषदेमध्ये रुजू झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी आज विविध विभागांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प अधिकारी नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप मुळे, समाज कल्याण अधिकारी गीता गुठ्ठे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे यांच्यासह विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी बांधकाम विभागाचा आढावा घेतला. जिल्ह्यात सुरु असलेली बांधकामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रस्ते, पुल, इमारत बांधकामे दर्जेदार होतील याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी अभियंत्यांनी वारंवार कामाला भेटी देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सध्या मंजूर असलेल्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्याचे आदेशही त्यांनी दिले.
आरोग्य विभागांतर्गत असलेल्या रुग्णवाहिका सुस्थितीत असल्याची खात्री करावी. सर्व रुग्णवाहिका ऑन रोड ठेवाव्यात. ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा मिळावी यासाठी वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे. निवीदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामांचे कार्यारंभ आदेश तातडीने द्यावेत. प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये मुबलक औषधसाठा राहिल याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
या शिवाय समाज कल्याण विभागाने योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करून त्याचा पात्र लाभार्थींना लाभ देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तर औंढा नागनाथ पंचायत समिती अंतर्गत 57 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात अद्याप निलंबनाची कारवाई का झाली नाही असा सवाल त्यांनी केला. पुढील आढावा बैठकीत सर्व अद्ययावत माहिती सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.






















