अवकाश विज्ञान आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देते, ज्यामुळे देशांमध्ये शांततापूर्ण संबंध निर्माण होण्यास मदत होते, असे मत स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, इस्रोचे माजी संचालक पद्मश्री डॉ. प्रमोद काळे यांनी व्यक्त केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे
.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत कोथरुड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृहात याचे उद्घाटन झाले.
यावेळी नवी दिल्ली येथील आध्यात्मिक शास्त्रज्ञ डॉ. सी.के. भारद्वाज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड अध्यक्षस्थानी होते. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, माईर्सचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी आणि व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पात्रे यांचीही उपस्थिती होती. या प्रसंगी पद्मश्री डॉ. प्रमोद काळे यांना मान्यवरांच्या हस्ते ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
डॉ. प्रमोद काळे यांनी पुढे सांगितले की, अवकाशातून पृथ्वीचे अवलोकन करताना जमीन आधारित, हवाई आणि उपग्रहांच्या माध्यमातून पाणी व वायुमंडलाची माहिती एकत्रित केली जाते. नैसर्गिक घटना, संकटे आणि मानवी गतिविधींवर लक्ष ठेवले जाते. अंतराळ संप्रेषणामध्ये संप्रेषण उपग्रह, ग्राउंड स्टेशन आणि डीप स्पेस नेटवर्कसारख्या तंत्रज्ञानाचा वापर होतो. अंतराळातील वेगवेगळ्या बिंदूंमधील किंवा पृथ्वी आणि अवकाशातील माहिती व डेटाचे प्रसारण केले जाते. अंतराळातील वातावरण पृथ्वीवरील वातावरणापेक्षा पूर्णपणे वेगळे असून, त्यात हवा नाही, व्हॅक्यूम आहे, तसेच प्रचंड तापमान आणि रेडिएशनसारखे अनेक धोके आहेत. हे वातावरण गुरुत्वाकर्षण, रेडिएशन आणि सूक्ष्म उल्कापिंडांपासून बनलेले आहे.
डॉ. सी.के. भारद्वाज यांनी आपल्या भाषणात सध्या संपूर्ण जगात अध्यात्म आणि शांतीची गरज असल्याचे नमूद केले. अध्ययन क्षेत्रामध्ये अध्यात्म आणि विज्ञानाची संकल्पना रुजविणे आवश्यक आहे. मानवजातीच्या आणि स्वतःच्या उत्थानासाठी युनिव्हर्सलमधील ऊर्जेचा योग्य वापर करावा. कोणत्याही रचनात्मक निर्मितीसाठी व कार्यासाठी ऊर्जा अत्यंत आवश्यक असते. शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत, असेही ते म्हणाले.






















