नागपुरात बनावट विक्रीपत्रे तयार करून, एकाच मालमत्तेची अनेकांना विक्री करून तसेच पैसे घेऊनही भूखंड किंवा फ्लॅट न देता ग्राहकांची फसवणूक केल्याची पाच प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणात एकूण ५ कोटी ५ लाख ११ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाली असून, विविध पोली
.
हुडकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, आरोपी अविनाश शरदचंद्र खडके याने सहदेव हरगोविंद घिया (वय ७०) यांना मानेवाडा येथील लेआउटमधील भूखंड क्रमांक ५४ विकला. त्याचे रीतसर विक्रीपत्र करून दिल्यानंतरही, तोच भूखंड त्याने लोकेश गणपतराव चौधरी यांना विकला. या प्रकरणात घिया यांची ३० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
दुसऱ्या एका प्रकरणात, देवयानी मधुकरराव सुरजसे यांनी आरोपी धीरज श्यामराव राजपूत यांना घर खरेदीसाठी धनादेशाद्वारे आणि रोख स्वरूपात ८ लाख ७१ हजार रुपये दिले. मात्र, आरोपी राजपूतने त्यांना घर न देता फसवणूक केली.
कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल एका प्रकरणात, आरोपी हितेश रघुवीरशरण अग्रवाल (वय ४२) याने सविता वसंत उजवणे यांच्या जागी बनावट महिला उभी केली. त्यासाठी बनावट आधार कार्डचा वापर करून त्यांची बनावट सहीने आममुखत्यारपत्र (पॉवर ऑफ ॲटर्नी) तयार केले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने बेसा येथील त्यांचे दोन भूखंड विकून ८० लाख रुपयांची फसवणूक केली.
कोतवालीमध्येच दाखल अन्य एका प्रकरणात, आरोपी गणेश गंगाराम धांडे (वय ६१) याने दिलीप नामदेवराव तुपकर (वय ५६) यांच्या शेताचे बनावट आममुखत्यारपत्र तयार केले. धांडे यांनी तुपकर यांचे बनावट छायाचित्र लावले, बनावट सही केली आणि चुकीचा पत्ता दाखवला. या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने १९ एकर शेतजमीन ३ कोटी ८० लाख रुपयांना विकून तुपकर यांची फसवणूक केली.
शांतनगर पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारचे प्रकरण दाखल झाले आहे. आरोपी सुहास लाउत्रे आणि रचना नीलकंठ गजभीये (वय ३४) यांनी संगनमत करून, त्यांच्या नावावर नसलेल्या जमिनीत प्लॉट टाकले. हे प्लॉट त्यांनी रामकृपाल कोरेलाल यादव यांच्यासह इतर चार जणांना विकले. या प्रकरणात त्यांची ६ लाख ४० हजार रुपयांनी फसवणूक झाली आहे.






















