चांदुर रेल्वे नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसला स्वपक्षातूनच आव्हान निर्माण झाले आहे. काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते हर्षल वाघ यांच्या पत्नी पूजा हर्षल वाघ यांनी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. यामुळे काँग्रेससमोर
.
हर्षल वाघ हे अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय असून सहकार क्षेत्रात त्यांची मजबूत पकड आहे. त्यांनी त्यांच्या पत्नी पूजा वाघ यांच्यासाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागितली होती, परंतु पक्षाने ती दिली नाही. यानंतर त्यांनी बंडखोरी करत पूजा वाघ यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.
विशेष म्हणजे, हर्षल वाघ स्वतः प्रभाग क्रमांक चारमधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहेत. सहकार क्षेत्रातील त्यांच्या प्रभावामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चांदुर रेल्वे नगरपालिकेत एकूण २० नगरसेवक आणि एका नगराध्यक्षाची निवड होणार आहे. दहा प्रभागांसाठी ही निवडणूक होत असून, नगराध्यक्षपदासाठी सहा तर नगरसेवकपदासाठी ९९ उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे.
काँग्रेस, भाजप, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उबाठा) आणि आम आदमी पार्टीने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभे केले आहेत. अपक्ष उमेदवार पूजा हर्षल वाघ यांनी या लढतीत आव्हान निर्माण केले आहे. नगरसेवक पदासाठी कोणत्याही पक्षात बंडखोरी झाली नसली तरी, गेल्या तीन दिवसांत काही पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सद्यस्थिती पाहता, चांदुर रेल्वे नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट आहे.






















