पुण्यात ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीने (DPES) ‘कॅम्पफायर स्टोरीटेलिंगमध्ये सर्वात मोठा श्रोतवृंद’ असा नवीन गिनीज विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. खराडी कॅम्पसमध्ये आयोजित या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा सांगण्यात आल्या.
.
या कथाकथन कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या १२ किल्ल्यांशी संबंधित कथा सांगितल्या. या किल्ल्यांना नुकतेच युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले आहे.
खराडी कॅम्पसमध्ये तयार केलेल्या एका मोठ्या शेकोटीभोवती आयोजित या कार्यक्रमात तब्बल ४६२३ श्रोत्यांनी सहभाग नोंदवला. यात विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचा समावेश होता.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे वरिष्ठ ॲडज्युडिकेटर प्रवीण पटेल यांनी लंडनहून येऊन या विक्रमाची पाहणी केली. त्यांच्या हस्ते ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोले पाटील यांना विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या उपक्रमाबद्दल बोलताना सागर ढोले पाटील म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत स्थान मिळाल्यानंतर, या किल्ल्यांचे महत्त्व आणि शिवरायांचे कर्तृत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने आम्ही हा उपक्रम हाती घेतला.”
ते पुढे म्हणाले की, कॅम्पफायर स्टोरीटेलिंग ही संकल्पना जगभरातील गिर्यारोहकांमध्ये लोकप्रिय आहे. या श्रेणीत गिनीज विश्वविक्रम केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या अद्वितीय किल्ल्यांची माहिती देशांतर्गत तसेच देशाबाहेरील गिर्यारोहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीने एका वर्षाच्या आत केलेला हा तिसरा गिनीज विश्वविक्रम आहे. यापूर्वी, ८ तासांमध्ये १००० व्यक्तींना कृत्रिम अवयव बसवणे आणि गणेशोत्सवादरम्यान १७२४ नागरिकांच्या सहभागाने दिवे ओवाळून एकत्रित आरती करणे, असे दोन विश्वविक्रम संस्थेने प्रस्थापित केले आहेत.
























