डायनासोरचा शोध: आजवर जगभरात विविध क्षेत्रांमध्ये विविध संशोधनं दर दिवशी सुरू असून असंच एक मोठं संशोधन अर्जेंटिनातील ‘नॅशनल काऊंसिल फॉर साईंटिफिक अँड टेक्निकल रिसर्च’ अर्थात CONICET नं केलं. ज्याच्या माध्यमातून कैक संशोधनांना नवी कलाटणी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही महिन्यांपूर्वी याच संस्थेकडून एक महत्त्वपूर्ण मोहिम राबवण्यात आली होती, जी प्रचंड प्रमाणात यशस्वी ठरली असून, पाणबुडीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या मोहिमेमुळं समुद्राच्या तळाशी असणाऱ्या विश्वाचा नव्यानं उलगडा होणार आहे. इतकंच नव्हे तर असंख्य संशोधकांसाठी कुतूहलाचा विषय ठरणाऱ्या डायनासोरसंदर्भातील बहुविध पैलूंची माहिती या संशोधनातून मिळणार आहे.
CONICET च्या जीवाश्मशास्त्रज्ञांना संशोधनादरम्यान डायनासोरचं अंडं सापडलं असून हे अंडं साधारण 70,000,000 (7 कोटी) वर्षांपूर्वीचं असून अद्यापही ते मूळ स्वरुपात असल्याचं म्हटलं जात आहे. CONICET चे प्रमुख डॉ. फेडेरिको अॅग्नोलिन यांच्या नेतृत्त्वात हे संशोधन झालं असून, पॅटागोनियाच्या दक्षिणेकडील भागामध्ये ही महत्त्वपूर्ण बाब आढळली. यापूर्वीही अर्जेंटीनामध्ये डायनासोरची अंडी सापडली, पण मूळ स्वरुपात सापडलेलं हे पहिलंच अंडं ठरत आहे जे सध्या जीवाश्माच्या रुपात दिसत आहे.
सदर संशोधनातून अभ्यासकांना डायनासोरच्या प्रजातीचा नेमका विकास कसा झाला आणि पुढे त्यांच्यातील बदलांमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी लक्ष वेधून गेल्या याचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. किंबहुना डायनासोरचं मुळ लक्षात घेण्यासही यातून मदत मिळेल. सखोल निरीक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार हे अंडं Bonapartenykus प्रजातीच्या डायनासोरचं आहे. मांसाहरी श्रेणीतील हे लहान डायनासोर असून, त्यांचा वावर कोट्यवधी वर्षांपूर्वी अर्जेंटिनाच्या दाक्षिणात्य भागांमध्ये होता.
दरम्यान हे अंडं ज्या स्थितीत सापडलं तेव्हा त्यावर इतर जीवाश्मांचा घेराव होता. ज्यामुळं डायनासोर नेमके कसे वाढले, त्यांच्या शरीरात नेमके कसे आणि किती बदल झाले याचीसुद्धा माहिती या अंड्याच्या जीवाश्मातून मिळणार आहे. उपलब्ध माहितीनुसार हे अंडं Patagoniaच्या संग्रहालयात पाठवण्यात येणार असून, स्थानिकांना हे जीवाश्म जवळून पाहता येणार आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
CONICET ही संस्था काय आहे आणि त्यांनी काय शोध लावला?
CONICET ही अर्जेंटिनातील ‘नॅशनल काऊंसिल फॉर साईंटिफिक अँड टेक्निकल रिसर्च’ नावाची संस्था आहे. त्यांनी अलीकडेच एका संशोधनादरम्यान डायनासोरचे अंडे शोधले आहे, जे सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वीचे आहे आणि ते मूळ स्वरूपात जीवाश्माच्या रूपात सापडले आहे.
हे डायनासोरचे अंडे कुठे आणि कसे सापडले?
हे अंडे अर्जेंटिनाच्या पॅटागोनियाच्या दक्षिणेकडील भागात सापडले. CONICET चे प्रमुख डॉ. फेडेरिको अॅग्नोलिन यांच्या नेतृत्वात चाललेल्या संशोधन मोहिमेदरम्यान ते आढळले. सापडलेल्या ठिकाणी इतर जीवाश्मांचा घेराव असल्याने ते चांगले संरक्षित राहिले आहे.
हे अंडे कोणत्या डायनासोरच्या प्रजातीचे आहे?
हे अंडे Bonapartenykus प्रजातीच्या डायनासोरचे आहे. ही प्रजाती मांसाहारी आणि लहान आकाराची होती, जी कोट्यवधी वर्षांपूर्वी अर्जेंटिनाच्या दक्षिणेकडील भागात वावरत असे.

































