पुणे : राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी दिवाळीपूर्वी बिगुल वाजणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र, नगरविकास विभागाने प्रभागरचनेसाठी एक महिन्याची मुदतवाढ दिल्याने आता या निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत घ्याव्यात, असे स्पष्ट निर्देश दिले. त्यानंतर सत्ताधारी, विरोधक, आजी-माजी नगरसेवक व इच्छुकांनी तयारीला गती दिली होती. पक्षपातळीवर बैठका, कार्यकर्त्यांमध्ये संवाद, जनसंपर्क मोहिमा सुरू झाल्या होत्या. निवडणूक आयोगानेही प्रभागरचनेसाठी कार्यक्रम आखल्याने निवडणूक दिवाळीपूर्वी होईल, असा अंदाज होता.
मात्र सोमवारी (२३ जून) नगरविकास विभागाने अचानक पत्रक जारी करून प्रभागरचनेची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्याच्या तारखेत बदल करत एक महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याचे संकेत ठळकपणे दिसत आहेत.
प्रभाग रचना प्रक्रिया अशा पद्धतीने
- मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अ, ब, क, ड वर्ग महापालिका आणि नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेसाठी संबंधित आयुक्त, मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
- प्रभाग रचनेचे प्रारूप संबंधित विभागाच्या प्रधान सचिवांना सादर करावे लागणार आहे.
- त्यानंतर नगरविकास विभागाकडून छाननी होऊन निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवले जाईल.
- आयोगाकडून मंजुरी मिळाल्यावर प्रारूप प्रसिद्ध होईल आणि नागरिकांकडून हरकती मागवण्यात येतील.
- सुनावणी पार पडल्यानंतर अंतिम प्रभाग रचना घोषित होईल.
ड वर्ग महापालिका व नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेसाठीही हीच प्रक्रिया अनुसरण्यात येणार आहे. ड वर्गात प्रभाग आराखडा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पुढे पाठवला जाणार आहे. नगर पंचायतींसाठीही मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी व नगरविकास विभागाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
या विलंबामुळे इच्छुक उमेदवारांचे गणित बिघडले असून पक्षांतील तयारीसही ब्रेक लागण्याची शक्यता आहे. अनेकांनी जनसंपर्काची तयारी सुरू केली असली तरी निवडणुका दिवाळीनंतर किंवा नववर्षातच होण्याची शक्यता अधिक ठळक झाली आहे.
📌 थोडक्यात
प्रभागरचनेसाठी मुदतवाढ
निवडणुकीचे वेळापत्रक पुढे सरकण्याची शक्यता
इच्छुकांमध्ये संभ्रम, पक्षांत हालचाली मंदावण्याची चिन्हे


























