पुणे (खडकवासला) : खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज (बुधवार) दुपारी १ वाजता धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात १९२० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय अभियंता (खडकवासला विभाग) यांनी दिली आहे.
धरण क्षेत्रात होत असलेला पाऊस आणि येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्गाचे प्रमाण पुढील काळात कमी किंवा जास्त केले जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
नदी पात्रालगतच्या सखल भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. नदीपात्रात कोणीही उतरू नये. तसेच जनावरे किंवा तत्सम साहित्य नदीकाठी असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
नदीपात्रालगतच्या नागरिकांना प्रशासनाकडून सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले असून, स्थानिक यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही उपविभागीय अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या पुणे शहर व परिसरात जोरदार पावसाची स्थिती आहे. त्यामुळे पुढील काही तास नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा व अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


































