विमानांच्या कब्रिस्तानची मनोरंजक तथ्ये: अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातामध्ये 241 प्रवाशांनी आपले प्राण गामवले. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. या अपघाताची जगभरामध्ये चर्चा असून अनेक बड्या देशांच्या नेत्यांनी या अपघाताबद्दल हळहळ व्यक्त करतानाच तपासासाठी मदतीचा हातही पुढे केला आहे. मागील काही दशकांमधील भारताच्या इतिहासातील हा सर्वात घातक विमान अपघात ठरला असून सर्वच स्तरातून यासंदर्भात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र असं असतानाच या अपघाताच्या निमित्ताने विमान आणि जहाजांची स्मशानभूमी अशी ओळख असलेल्या एका प्रदेशाची चर्चाही सोशल मीडियावर होताना दिसतेय. आता हा काय प्रकार आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे एक असं ठिकाण आहे जिथे आतापर्यंत 20 हून अधिक विमानं आणि 50 जहाजं बेपत्ता झाली आहेत. हे ठिकाण नेमकं आहे कुठे आणि त्याचं गूढ काय आहे हे जाणून घेऊयात…
या ठिकाणाचं नाव काय?
ज्या ठिकाणाबद्दल आपण बोलतोय हा एक रहस्यमयी त्रिकोणी परिसर असून असं म्हणतात की या ठिकाणी जहाजं, विमानं अचानक गायब होतात. या जहाजांचं आणि विमानांचं काय होतं हे न उलगडलेलं कोडं आहे. अमेरिकेच्या आग्नेय किनार्यावर असलेले बर्म्युडा ट्रँगलचं गूढ मागील अनेक शतकांपासून कमी होण्याऐवजी वाढत गेल्याचं पाहायला मिळत आहे. 1945 पासून या ठिकाणी रहस्यमयरित्या विमानं आणि जहाजं गायब होत असून इथं असं का होतं हे अद्याप कोणालाही ठामपणे सांगता आलेलं नाही.
कुठे आहे हा प्रदेश?
बर्म्युडा ट्रँगल हा अमेरिकेच्या आग्नेयेला असलेलं फ्लोरिडा, प्यूर्टो रिको आणि बर्म्युडा या तिन्ही देशांना जोडणारा त्रिकोण आहे. उत्तर अटलांटिक महासागरात हा गूढ त्रिकोणी भाग आहे. या ठिकाणी पोहोचल्यानंतर 50 लहान-मोठी जहाजे गायब झाली. चुकून कुठलेही जहाज या ठिकाणी पोहोचले तर ते जहाज सामान आणि प्रवाशांसह कुठे गायब झाले हे आजपर्यंत कोणालाही कळू शकलेले नाही.
कोणकोणती विमानं झाली गायब?
बर्म्युडा ट्रँगलमध्ये 20 विमाने गायब झाली आहेत. सर्वात आधी 5 डिसेंबर 1945 रोजी अमेरिकी नौदलाच्या सरावादरम्यान फ्लाइट 19 हे विमान बेपत्ता झालं. या विमानात 14 सदस्य होते. हे विमान शोधण्यासाठी गेलेली विमानंही बेपत्ता झाली. या भागात स्टार टायगर, डग्लस डीसी-3 ही बर्म्युडा ट्रँगलमध्ये हरवलेली काही विमाने आहेत. या ठिकाणी परग्रहवासी पृथ्वीवरील लोकांवर हल्ले करतात, पृथ्वीवरील लोकांना वेगवेगळ्या प्रयोगांसाठी येथून अपहरण करुन नेलं जातं असा अनेकांचा समज आहे. मात्र यामागील खरं कारण अद्याप समोर आलेलं असून या ठिकाणासंदर्भात मागील अनेक दशकांपासून संशोधन सुरु आहे.
अपघात का होतात?
या प्रदेशासंदर्भात अभ्यास करण्यासाठी वेळोवेळी अनेक सरकारी, बिगर सरकारी समिती आणि गट स्थापन करण्यात आले. मात्र या बेपत्ता विमानं आणि जहाजांबद्दल कोणतीही ठोस माहिती हाती आली नाही. नोंदवलेल्या सर्व बेपत्ता विमान आणि जहाजांच्या घटना या नैसर्गिक असून तसं नसल्यास त्या मानवी चूक आणि चुकीचा अर्थ लावण्यामुळे झाल्या आहेत, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)






























