विनय नरवाल पत्नी अश्लील एआय व्हिडिओ प्रकरण: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. मरण पावलेल्यांमध्ये भारतीय लष्करामधील मेजर विनय नरवाल यांचाही समावेश होता. विनय नरवाल यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नीही बरीच चर्चेत आली. पतीसोबत लग्नानंतर फिरायला गेलेली असतानाच तिचं सौभाग्य पुसलं गेलं. या दुखामधून सावरत असतानाच आता तिचा चेहरा मॉर्फ करुन एक अश्लील व्हिडीओ व्हायरल होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणामध्ये हरियाणा बिहारमधून पोलिसांनी पिता-पुत्राच्या जोडीला अटक केली आहे.
अटक करण्यात आलेले दोघे कोण?
नरवाल यांच्या पत्नीचा चेहरा मॉर्फ करून अश्लील एआय व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी हरियाणा पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींना बिहारमधील गोपाळगंज येथून अटक करण्यात आली आहे. या दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. अटक केलेल्यांची नावं मोहिबुल हक आणि गुलाब जालान अशी आहेत. गुलाब जालान हा मोहिबुल हकचा मुलगा आहे. दोघेही मागील बऱ्याच काळापासून ‘रियल पॉइंट’ नावाचे यूट्यूब चॅनल चालवत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करून लोकांची फसवणूक करणारे अनेक व्हिडीओ या दोघांच्या युट्यूब चॅनलवर आहेत. व्हिडिओ आहेत ज्यामध्ये ना फसवले जात आहे आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ अपलोड केले जात आहेत.
दोघांना कशी अटक केली?
गोपाळगंज पोलिसांनी गुरुग्राम पोलिसांकडून दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बिहार पोलिसांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरही यासंदर्भातील माहिती दिली आहे. गोपाळगंजचे पोलीस अधिक्षक अवधेश दीक्षित यांनी ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत, “तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने यूट्यूब चॅनेल ट्रॅक करण्यात आलं. त्यानंतर आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली,” असं सांगितलं.
अधिक अधिक आव्हानात्मक झालंय अशा भामट्यांना पकडणं
यापूर्वीही असे अनेक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलीस प्रत्येक वेळी आरोपींवर कारवाई करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असतो. परंतु नवनव्या तंत्रज्ञानामुळे या आरोपींना पकडणं अधिक अधिक आव्हानात्मक होत आहे. त्यामुळे आरोपींप्रमाणे आता पोलीसही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अशा भामट्यांचा शोध घेतात.
ऑपरेशन सिंदूर
पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. भारतीय संरक्षण दलांनी पाकिस्तानातील बहावलपूर आणि मुरीदके येथील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या हल्ल्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले होते. भारतीय महिलांचं सौभाग्य पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारताने आखलेल्या या मोहिमेला सौभाग्याचं लेणं असलेल्या सिंदूरचं नाव देण्यात आलेलं.




























