Sanjay Manjrekar on Virat Kohli Decision to Quit Test: इंग्लंडचा फलंदाज जो रुटने कसोटी क्रिकेटमधील 41 वं शतक ठोकलं आहे. यानंतर माजी भारतीय क्रिकेटर संजय मांजरेकर यांनी विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेट सोडण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. जो रुट, स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन आणि विराट कोहली यांना कसोटी क्रिकेटमधील ‘फॅब 4’ म्हणून ओळखलं जात होते. विराट कोहली हा यामधील एकमेव क्रिकेटर आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. संजय मांजरेकरांनी इंस्टाग्रामला व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामधून त्यांनी विराट कोहलीने त्रुटी भरुन काढण्याऐवजी कसोटी क्रिकेट सोडण्याच्या विराट कोहलीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. याउलट त्याने सर्वात सोप्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळण्याला प्राधान्य दिल्याचंही त्यांनी म्हटलं.
“जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये नवीन उंची गाठत असताना, माझ्या मनात विराट कोहलीचा विचार येत आहे. त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, आणि हे दुर्दैवी आहे की, निवृत्त होण्यापूर्वीच्या पाच वर्षांच्या संघर्षकाळात, कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी पाच वर्षे 31 का होती, यामागील त्रुटी शोधण्यासाठी त्याने मनापासून प्रयत्न केले नाहीत. त्याने काय करायला हवे होते, हा विषय वेगळा आहे. पण मला फक्त वाईट वाटतं की जो रूट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन यांच्यासारखे खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये आपले नाव कमावत आहेत,” असं मांजरेकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर म्हटले.
आपली भूमिका स्पष्ट करताना मांजरेकर म्हणाले की, कोहलीने खेळाच्या तिन्ही प्रकारांमधून निवृत्ती घेतली असती तर त्यांना कोणतीही अडचण नव्हती. पण त्याने ‘सर्वात सोपा’ फॉरमॅट असलेल्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळणे सुरू ठेवले, पण कसोटी क्रिकेटमधील आपल्या चुका सुधारण्यास नकार दिला, या गोष्टीने त्यांना आश्चर्य वाटलं.
“विराट कोहलीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असती, सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यास घेतला असता तर ठीक आहे. पण त्याने एकदिवसीय क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे, ही गोष्ट मला अधिक निराश करते, कारण हा एक असा फॉरमॅट आहे, जो अव्वल फळीतील फलंदाजासाठी सर्वात सोपा फॉरमॅट आहे,” असंही त्यांनी म्हटलं.
“जो फॉरमॅट तुमची खरी परीक्षा घेतो, तो म्हणजे, कसोटी क्रिकेट आहे. टी-20 क्रिकेटची स्वतःची वेगळी आव्हानं आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे, तो इतका तंदुरुस्त असताना त्याने कदाचित आपला संघर्ष सुरू ठेवायला हवा होता असं वाटत राहतं. जरी त्याला एखाद्या मालिकेतून वगळले गेले असते तरी फॉर्ममध्ये परत येण्यासाठी तो कदाचित प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला जाऊ शकला असता. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये खेळू शकला असता, भारतात अधिक सामने खेळून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करू शकला असता,” असं मांजरेकर पुढे म्हणाले.
व्हिडिओचा समारोप करताना मांजरेकर म्हणाले की, कोहलीच्या निर्णयामुळे त्यांना निराशा आणि दुःख झाले आहे, कारण स्मिथ, विल्यमसन आणि रूटसारखे खेळाडू या फॉरमॅटमध्ये मोठी धावसंख्या उभारत आहेत.
“त्यामुळे मला खरोखर आनंद झाला असता. अर्थात, तो त्याचा निर्णय आहे, त्याची निवड आहे. पण हो, जेव्हा जो रूट शतके करतो किंवा धावा करतो, किंवा स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन धावा करतात, तेव्हा मला विराट कोहलीची आठवण येते आणि थोडी निराशा आणि दुःख वाटते. कारण त्याने कसोटी क्रिकेटची खूप काळजी घेतली होती, नाही का?,” असंही त्यांनी सांगितलं.






























