आयटी क्षेत्रातील नोकऱ्या: देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या कंपनीने आता थेट कॅम्पसमधून मुलांना नोकरी देण्याचं प्रमाण कमी करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून लागणाऱ्या नोकऱ्यांची संख्या कमी होणार आहे. ही कंपनी नेमकी आहे कोणती? तिने असा निर्णय का घेतला आहे? याचा काय परिणाम होणार? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात…
इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना बसणार फटका
सॉफ्टवेअर क्षेत्रातील भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिस लिमिटेडने येत्या काही वर्षांत कॉलेजमधून थेट पदवीधर होणाऱ्यांना विद्यार्थ्यांची भरती कमी करणार आहे. या निर्णयाचा फटका अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. या निर्णयामुळे इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. ऑटोमेशनमुळे एन्ट्री लेव्हलच्या नोकरीची संधी कमी होत असून आता हा ट्रेण्ड लवकरच इतर क्षेत्रांमध्ये दिसण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
का घेतला हा निर्णय?
“इन्फोसिस भविष्यात कमी कमी फ्रेशर्सना कामावर ठेवणार आहे. उच्च उत्पादकतेमुळे सक्षम कर्माचाऱ्यांना प्राधान्य असेल,” असे बीएमओ कॅपिटल मार्केट्सचे विश्लेषक कीथ बाचमन, ब्रॅडली क्लार्क, अॅडम जे. होलेट्स आणि जोनाथन स्टीन यांनी सांगितले. 16 डिसेंबर रोजी फर्मच्या व्यवस्थापनाशी झालेल्या संवादाचा हवाला देत ही माहिती देण्यात आली आहे. “इन्फोसिस प्रति व्यक्ती महसूल वाढण्याच्या प्रयत्नात आहे,” असेही या रिसर्च फर्मने म्हटले आहे. “कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढल्याने पुढील काही वर्षांत मॅनेजमेंटला अपेक्षा आहे की, कर्मचारी उत्पादकता वाढून मॅनेजमेंटमध्ये माफक प्रमाणात वाढ होईल,” असा उल्लेख करण्यात आला आहे.
आयटी क्षेत्रात मंदी
बंगळुरूमधील इन्फोसिस ही आयटी क्षेत्रातील पहिली कंपनी ठरली आहे ज्यांनी एन्ट्री लेव्हल नोकऱ्यांमध्ये घट होणार असल्याचा स्पष्ट अंदाज व्यक्त केला आहे. इन्फोसिसने गेल्या आर्थिक वर्षात कॉलेजमधून बाहेर पडल्या पडल्या नोकरी शोधणाऱ्या 15 हजार फ्रेशर्सला नोकरी दिली आहे. मॅक्रो-इकॉनॉमिक अनिश्चिततेमुळे क्लायंट खर्चात कपात करण्याचा दबाव आणि अमेरिकेतील व्हिसा निर्बंधांमुळे आयटी क्षेत्र मंदीचा सामना करत आहे.
यंदा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकऱ्यांची संधी नाही?
गेल्या दोन वर्षांत नवीन विद्यार्थ्यांची भरती मंदावली आहे, देशातील हजारो अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून पदवीधर झालेल्या सुमारे 1.3 लाख विद्यार्थ्यांसाठी हा धक्का आहे. भारतातील सर्वात मोठ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांना 2026 च्या बॅचसाठी आयटी आउटसोर्सर्स कमी फ्रेशर्सना नोकरी देतील अशी अपेक्षा आहे, असे ‘मिंट’ने म्हटलं आहे. इन्फोसिसचे उत्पन्न आर्थिक वर्ष 2025 मध्ये वर्षानुवर्षे 3.85% वाढून 19.28 अब्ज डॉलर्स झाले आहे.
आयटी क्षेत्रातील भारतातील टॉप चार कंपन्या कोणत्या?
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही भारतातील आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीमधील कर्मचाऱ्यांची संख्या 6 लाख 14 हजारांपर्यंत असून त्याखालोखाल इन्फोसिसचा क्रमांक लागतो. नारायण मूर्तींच्या या कंपनीमध्ये 3 लाख 23 हजार जण नोकरी करतात. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर 2 लाख 26 हजार कर्मचाऱ्यांसहीत ‘एचसीएल टेक’चा (HCLTech) क्रमांक लागतो तर चौथ्या स्थानी 2.30 लाख कर्मचारी असलेली ‘विप्रो’ (Wipro) कंपनी आहे.






























