अहमदाबाद विमान क्रॅश: अहमदाबाद पूल दुर्घटनेतील पीडितांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान नातेवाईकांनी आम्हाला संपूर्ण मृतदेहाचे अवशेष दिले जावेत अशी मागणी केली आहे. गुरुवारी झालेल्या एअर इंडिया विमान अपघातानंतर अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकूण 270 मृतदेह आणण्यात आले. 270 मृतदेहांपैकी 241 मृतदेह लंडनला जाणाऱ्या विमानातील प्रवासी आणि केबिन क्रू होते. उर्वरित मृतदेह बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात विमान कोसळल्याने झालेल्यांचे आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विमान अपघातातील मृतांच्या कुटुंबियांनी अधिकाऱ्यांकडे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे काही भाग देण्याऐवजी सर्व अवशेष द्यावेत अशी विनंती केली आहे. शनिवारी एक व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मृतदेहाचे सर्व अवशेष द्यावेत जेणेकरुन अंत्यसंस्कार करता येतील यासाठी विनंती करत होता. पण हे अशक्य असल्याचं त्याला सागंण्यात आलं. “त्याला ते पटवून देणं फार कठीण होतं,” असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
अधिकाऱ्यांनी डीएनए चाचण्या सुरू केल्या असतानाही अपघातातील पीडितांच्या कुटुंबियांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागाराबाहेर गर्दी केली आहे. बीजे मेडिकल कॉलेजचे अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक रजनीश पटेल यांनी सांगितलं आहे की, डीएनए सॅम्पलिंग प्रक्रियेद्वारे एकूण 32 मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आहे आणि यापैकी 12 मृतदेह संबंधित कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. यापैकी आठ मृतदेहांची डीएनए चाचणी गरजेची नसल्याने ते कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
दरम्यान या प्रक्रियेत अनेक अडथळेही येत आहेत. टाइम्सच्या वृत्तानुसार, एका विचित्र प्रकरणात, पीडितेच्या कुटुंबातील सदस्याला एकाच बॉडी बॅगमध्ये दोन मुंडकी आढळली आहेत. यानंतर पुन्हा डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “डीएनए सॅम्पलिंग प्रक्रिया पुन्हा करावी लागेल कारण ते अवयव दोन पीडितांचे आहेत आणि ते एकाच बॅगेत नसायला हवे होते,” असं सिव्हिल हॉस्पिटलमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
एअर इंडियाचा बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाचा पहिलाच जीवघेणा अपघात
गुरुवारचा एअर इंडियाचा विमान अपघात हा बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाचा पहिला जीवघेणा अपघात होता. लंडनच्या गॅटविक विमानतळावर जाणारे हे विमान अहमदाबादच्या सरदार पटेल वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच कोसळले. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर चौकशी सुरू झाली आहे, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटनमधील तज्ज्ञ आले आहेत.
242 प्रवासी आणि केबिन क्रू असलेले हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी वसतिगृहात कोसळले. विमानातील 242 जणांपैकी 40 वर्षीय भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक रमेश विश्वासकुमार या अपघातातून वाचलेला एकमेव प्रवासी आहे.





























