मानवी सभ्यता: जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींमध्ये, हडप्पा म्हणजेच सिंधू संस्कृती आणि सुमेरियन संस्कृतीची नावे तुम्ही पुस्तकात वाचली असतील, सिनेमांत त्याच्या कहाण्या पाहिल्या असतील. पण याही पेक्षा जुने संशोधन समोर येतंय. यापेक्षा जुन्या संस्कृती देखील या पृथ्वीवर अस्तित्वात होत्या, हे समोर आलेल्या संशोधनातून कळतंय. हिंदी महासागरातूनही असाच एक शोध लागलाय. हिंदी महासागरातील एका संस्कृतीबद्दल माहिती ऐकून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. जी सिंधू संस्कृती आणि सुमेरियन संस्कृतींपेक्षा शतकानुशतके जुनी असू शकते. मानवी संस्कृतीची मुळे आपल्या कल्पनेपेक्षा खूप जुनी आहेत, हे यातून कळते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
2 दशकांपूर्वी शोध
पश्चिम भारताच्या किनाऱ्याजवळ एक रहस्यमय पाण्याखालील स्थळ सापडलंय. हे प्राचीन स्थळ संस्कृतींचा अध्याय पुन्हा लिहू शकते, असे मानले जाते.टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलंय. सुमारे 2 दशकांपूर्वी खंभातच्या आखाताच्या खोलवर संशोधकांना हे ठिकाण सापडलं. या वस्तुस्थितीची कधीही पूर्णपणे कबुली किंवा खंडन करण्यात आलेले नाही. पण आजही या संस्कृतीबद्दल चर्चा सतत सुरू आहे.
शोधात काय सापडलं?
खरंतर 2000 मध्ये राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (NIOT) ने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील खंभातच्या आखातात एक महत्त्वाचा शोध लावला. नियमित प्रदूषण सर्वेक्षणादरम्यान हा शोध लागला. सर्वेक्षणादरम्यान सोनार तंत्रज्ञानाने समुद्राच्या तळाशी भौमितिक रचना दर्शविल्या. या वास्तू बुडालेल्या शहराच्या अस्तित्वाकडे निर्देश करत होत्या.
सिंधू संस्कृतीच्या आधी
हे कथित शहर पाण्याखाली 120 फूट खोलवर वसलेले आहे. हे शहर 5 मैल लांब आणि 2 मैल रुंद असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. या ठिकाणाहून मातीची भांडी, मणी, पुतळे आणि मानवी अवशेष अशा अनेक गोष्टी सापडल्या. जेव्हा त्यांना कार्बन-डेटेड केले गेले तेव्हा या कलाकृती सुमारे 9,500 वर्षे जुन्या असल्याचे आढळून आले.या गोष्टी सिंधू संस्कृतीच्या आधीच्या असू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.
तज्ञांचे मत काय?
हे अवशेष एका अतिशय प्रगत संस्कृतीचे संकेत देतात जी गेल्या हिमयुगाच्या शेवटी समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे पाण्यात बुडाली होती, असे NIOT च्या वैज्ञानिक पथकाचे डॉ. बद्रीनारायण यांनी सांगितले. तसेच हडप्पा संस्कृती या समुद्राखालील संस्कृतीतून विकसित झाली असावी, असेही ते पुढे म्हणाले. काही तज्ञांनी या दाव्यावर प्रश्नही उपस्थित केलेयत. काही कलाकृती प्राचीन नद्यांनी वाहून नेल्या असतील, असंही म्हंटलं जातंय. यासोबतच कार्बन डेटिंगच्या विश्वासार्हतेबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.





























