आयपीएल 2025: आयपीएल 2025 ही स्पर्धा आता अत्यंत रोमांचक वळणावर आहे. स्पर्धेच्या लीग स्टेजचे केवळ 2 सामने शिल्लक असून या उर्वरित 2 सामन्यांच्या निकालावरून प्लेऑफचे टॉप 2 संघ घोषित होतील. गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स या चार संघांनी त्यांच प्लेऑफमधील स्थान निश्चित केलं असलं तरी प्लेऑफ टॉप 2 मध्ये कोणते संघ जाणार याचा निर्णय अजून व्हायचा आहे. चेन्नई सुपरकिंग्सने त्यांच्या शेवटच्या लीग स्टेज सामन्यात गुजरात टायटन्सला बाद केले, त्यामुळे आता गुजरात केवळ दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याची आशा करू शकतात. तसेच यासाठी त्यांना दुसऱ्या संघांच्या सामन्याच्या निर्णयावर अवलंबून रहावं लागेल.
तीन संघांमध्ये टेबल टॉप करण्याची शर्यत :
सध्या पॉईंट्स टेबल पाहिलं तर गुजरात टायटन्स सध्या पहिल्या क्रमांकावर असून पंजाब किंग्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या तर मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर आहे. गुजरात आणि पंजाब संघाला त्यांच्या मागील सामन्यात मिळालेल्या पराभवामुळे टॉप 2 चं समीकरण आता बदललं आहे. आतापर्यंत संपूर्ण 18 व्या सीजनमध्ये असलेली गुजरात टायटन्स लागोपाठ दोन सामन्यात पराभूत झाली आहे. त्यामुळे आता उर्वरित तीन संघ मुंबई, पंजाब आणि आरसीबी हे टेबल टॉप करण्याच्या शर्यतीत आहेत.
मुंबई इंडियन्सचं कमबॅक :
तब्बल 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्सने यंदा स्पर्धेत जबरदस्त कमबॅक केलं. मुंबईने या सीजनची सुरुवात 5 सामन्यात पराभूत करून केली होती. मात्र त्यानंतर मुंबई इंडियन्सने कमबॅक केलं आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं. 13 सामन्यात 16 पॉईंट्सने ते सध्या चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांचा शेवटचा लीग स्टेज सामना हा पंजाब किंग्स सोबत होणार आहे. या सामन्यातील विजेता टॉप 2 मध्ये स्थान मिळवेल.
टॉपवर कशी पोहोचू शकते मुंबई इंडियन्स :
मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट हा + 1.292 असून तो या सीजनमधील 10 संघांपैकी सर्वात चांगला आहे. सोमवारी जयपूरमध्ये मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्सचा सामना करायचा आहे. गुजरात टायटन्स लागोपाठ 2 पराभवामुळे टॉपवर पोहोचू शकत नाही. त्यामुळे मुंबई आणि पंजाब सामन्यात विजयी संघ हा गुजरातला बाजूला सारून पॉईंट्स टेबलच्या टॉप 1 वर स्थान मिळवेल.
मुंबईकडे सध्या 16 पॉईंट्स असून ते सोमवारी पंजाबला पराभूत करू शकले तर थेट 18 पॉईंट्स सह टॉप 1 वर पोहोचू शकतात. तसेच मंगळवारी आरसीबी लखनऊ सामन्यात आरसीबी पराभूत झाली तर आरसीबी 17 पॉईंट्सवरचं राहील, परंतु आरसीबी हा सामना जिंकली तर त्यांचे 19 पॉईंट्स होऊन ते टेबल टॉप करतील. मुंबई इंडियन्सला पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्यासाठी पंजाब किंग्स विरुद्ध सोमवारी होणारा सामना काहीही करून जिंकावा लागेल.
तर जर मुंबई इंडियन्सचा संघ या सामन्यात पराभूत झाला तर ते चौथ्या स्थानावर राहतील.
































