कुवैत नागरिकत्व बातम्या: तुम्ही सकाळी उठता आणि तुमचे बँक खाते बंद असते? ऑनलाइन पेमेंटही करता येत नाही? तुम्हाला सर्व सरकारी सुविधा मिळणे बंद होते? असे घडू शकते असा कधी विचार केलाय का? पण जगाच्या एका कोपऱ्यात असं घडलंय. मुस्लिम देश कुवेतमधून मुस्लिम महिलांसोबत असाच प्रकार घडलाय. त्यांनी चौकशी केली तुमचे नागरिकत्व रद्द करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले.
कुवेत सरकारने एका रात्रीत हजारो लोकांचे नागरिकत्व रद्द केले. या यादीत बहुतेक महिलांचा समावेश आहे. लग्नानंतर येथील नागरिकत्व मिळालेल्या लोकांचे नागरिकत्व सरकार बहुतेकदा रद्द करतंय. या यादीत कुवेती पुरुषांशी लग्न करून नागरिकत्व मिळवणाऱ्या महिलांचा समावेश आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलंय.
रक्ताचे नाते असलेल्यांनाच कुवेती नागरिकत्व
जॉर्डनमधील एक महिला तिच्या क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट करण्यासाठी गेली. पण आपलं खातं गोठववल्याचे तिला कळले. हा धक्का इथवरच थांबला नाही. तर तिचे नागरिकत्व काढून घेण्यात आल्याची माहिती तिला मिळाली. डिसेंबर २०२३ मध्ये अमीर शेख मेशाल अल अहमद अल सबाह कुवेतचे अमीर बनले. यानंतर त्यांनी संसद बरखास्त केली आणि संविधानातील काही भाग काढून टाकला. ज्या लोकांचे येथील लोकांशी रक्ताचे नाते आहे त्यांनाच कुवेती नागरिकत्व मिळू शकते, असे आमीर म्हणाले.
कुवेतमध्ये फक्त या लोकांनाच सरकारी सुविधा
कुवेतमध्ये आधीच असे बरेच लोक राहतात ज्यांच्याकडे तेथील नागरिकत्व नाही. 1961 मध्ये ब्रिटिश संरक्षणापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुमारे 1 लाख लोकांना नागरिकत्व मिळू शकले नाही. नागरिकत्व असलेल्या लोकांना बँकिंग, शिक्षण, सरकारी नोकऱ्या आणि इतर सर्व सुविधांचा लाभ घेता येईल.
लग्नाच्या आधारे नागरिकत्व मिळवणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या
1987 पासून विवाहाच्या आधारे कुवेतमध्ये नागरिकत्व मिळवणाऱ्यांवर सरकार आता कारवाई करतंय. समोर आलेल्या आकडेवारीनुसार 1992 ते 2020 पर्यंत 38 हजार 505 महिलांनी येथे लग्न करून नागरिकत्व मिळवले. याशिवाय दुहेरी नागरिकत्व असलेल्या लोकांचे नागरिकत्व देखील काढून घेतलं जातंय. मोठी गोष्ट म्हणजे या यादीत पॉप गायक नवल आणि अभिनेता दाऊद हुसेन यांच्या नावाचाही समावेश आहे.



























