कुश मनी कोण बनवते: भारतीय मोटरस्पोर्ट्ससाठी 24 मे हा एक अभिमानाचा क्षण ठरला आहे. अवघ्या 24 वर्षीय कुश मैनीने मोनाको ग्रां प्रीतील फॉर्म्युला 2 स्प्रिंट रेस (Formula 2 Race at Monaco) जिंकत इतिहास रचला आहे. प्रतिष्ठेच्या मोंते कार्लो सर्किटवर रेस जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. DAMS लुकास ऑईल टीमकडून स्पर्धा करताना कुशने पोल पोझिशनवरून सुरुवात करत शेवटपर्यंत आघाडी टिकवली आणि शानदार विजय मिळवला. फॉर्म्युला २ मध्ये पहिल्यांदाच पोल पोझिशनवर भारतीय उभा होता आणि ट्रॉफीसोबत पार्श्वभूमीवर राष्ट्रगीत ऐकण्याचे अनेक भारतीयांचे स्वप्न अखेरीस पूर्ण झाले होते. या इतिहासोबत आज भारताला फॉर्म्युला रेसर मिळाला आहे.
मोटरस्पोर्ट्स पार्श्वभूमी असलेले कुटुंब
कुश मैनीचा रेसिंगशी संबंध फक्त त्याच्या या उत्तम करियरपुरतेच मर्यादित नाही. 2000 साली जन्मलेला कुश एका पूर्णतः मोटरस्पोर्ट्स पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येतो. कुश मैनीचा भाऊ अर्जुन मैनी हा देखील एक रेसर आहे. याशिवाय त्याचे काका चेतन मैनी हे सन मोबिलिटीचे (SUN Mobility) संस्थापक असून, भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार “REVA” बनवण्याचे श्रेय त्यांना जाते. अशी उत्तम कुटुंब पार्श्वभूमी असलेल्या घरात आता इतिहास घडवलेला तरुण आहे.
Alpine F1 टीमचा रिझर्व्ह रेसर
कुश सध्या Alpine F1 टीमचा रिझर्व्ह रेसर आहे आणि महिंद्रा रेसिंगसाठी फॉर्म्युला E मध्येही सक्रिय आहे. Alpine F1 सोबत काम करणारा तो 2012 नंतरचा पहिला भारतीय आहे. नारायण कार्तिकेयन आणि करुण चंदोक यांच्या पावलावर पाऊल ठेवत कुश आता F1 च्या दारात पोहोचला आहे. तो Alpine च्या सिम्युलेटर आणि विकास कार्यक्रमातही काम करतो.
जिंकल्यावर काय म्हणाला कुश?
विजयानंतर आपल्या भावना व्यक्त करत कुश म्हणाला, “P1 मिळवणं आणि मोनाकोमध्ये विजय मिळवणारा पहिला भारतीय होणं, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. हे खरंच स्वप्नपूर्तीसारखं आहे. DAMS टीम आणि माझ्या सर्व समर्थकांचे आभार.”
भारतातील मोटरस्पोर्ट्सला एक काळ होता जेव्हा बुद्ध इंटरनॅशनल सर्किटमुळे जागतिक नकाशावर स्थान मिळालं होतं. पण खर्चिक स्पर्धा, प्रशिक्षण आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे 2013 नंतर भारतात F1 थांबली. आता इंडियन रेसिंग लीग, F4 चॅम्पियनशिप यांसारख्या नव्या स्पर्धांमुळे भारतीय रेसिंग पुन्हा उभारी घेतेय. कुश मैनीच्या या ऐतिहासिक विजयानं भारताचा F1 चा स्वप्नवत प्रवास पुन्हा सुरू झाल्याचं स्पष्ट संकेत दिले आहेत. मोटरस्पोर्ट्सप्रेमींना आता कुशमध्ये भारताचा पुढचा F1 सुपरस्टार दिसतोय.
































