1997 चा मल्टीस्टारर चित्रपट ‘बॉर्डर’ अजूनही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. आता बॉर्डर 2 देखील प्रदर्शित होणार आहे, ज्याच्या शूटिंगमध्ये सनी देओल व्यस्त आहे. दरम्यान, बॉर्डरमध्ये भैरव सिंहची भूमिका साकारणारा अभिनेता सुनील शेट्टी याने एका कार्यक्रमात सांगितले की, सुरुवातीला त्याने ही भूमिका नाकारली होती. याचं कारण म्हणजे जेपी दत्ता यांचा राग होता. सुनील शेट्टीने खुलासा केला की, तो चित्रपट निर्मात्यासोबत काम करण्यास संकोच करत होता आणि सेटवर होणाऱ्या संघर्षाची त्याला भीती वाटत होती. अलीकडेच त्याने रेडिओ नशाला सांगितले की, जेपी दत्ता यांची कडक आणि शिस्तीचे दिग्दर्शक. त्यांच्या या स्वभावामुळे सुनील शेट्टीला या चित्रपटाचा भाग व्हायचे नव्हते.
सुनील शेट्टी म्हणाले, “मी ही भूमिका नाकारली कारण मी ऐकले होते की, जेपी दत्ता खूप कडक दिग्दर्शक होते आणि जर ते रागावले तर ते शिवीगाळही करायचे. मी स्वतः खूप रागीट होतो. जेव्हा जेपीजी मला भेटायला आले तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘मी विचार करुन कळवेन.’ मग मी माझ्या सेक्रेटरीला सांगितले, ‘मी हे करू शकणार नाही कारण जर त्याने मला शिवीगाळ केली तर मी हात वर करेन.’
पुढे सुनील म्हणाला, “मला कोणाशीही नाते बिघडवायला आवडत नाही, म्हणून मी विचार केला की, हा सिनेमा आपण नाकारायचा. पण जेपीजी मला कास्ट करण्यासाठी इतके हट्टी होते की त्यांनी भरत शाह यांच्याशी संपर्क साधला, ज्यांची माझ्या सासूची ओळख होती. म्हणून, माझ्या सासूच्या माध्यमातून, चित्रपट माझ्याकडे परत आला. त्यांनी मला बसवले आणि चित्रपटात काम करण्यास राजी केले. मी त्यांना सांगितले की या माझ्या अटी आहेत – आणि जर अशी परिस्थिती उद्भवली तर मी चित्रपट सोडेन.”
सुनील शेट्टीने असेही सांगितले की, शूटिंगच्या पहिल्या दिवशी त्याच्या आणि चित्रपट निर्मात्यामध्ये मोठे भांडण सुरू झाले. पण अभिनेत्याने चित्रपट निर्मात्याबद्दलचे त्यांचे प्रेम व्यक्त केले आणि आठवण करून दिली की त्यांच्या सर्वात वाईट काळातही, जेपी दत्ता नेहमीच त्यांना कोणताही विचार न करता चित्रपटांमध्ये कास्ट करायचे. 1997 चा हा एपिक वॉरर चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे, ज्यामध्ये सनी देओल, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, सुदेश बेरी आणि पुनीत इस्सर मुख्य भूमिकेत होते.
































