मुळशी (अंबडवेट) : स्वर्गीय सतीश सुतार यांच्या स्मरणार्थ सुतारवाडी (ता. मुळशी) येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला.
या वेळी पहिली ते आठवीच्या ४०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच वह्या व एक दप्तर याप्रमाणे सुमारे १५०० फुलस्केप वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, माजी सभापती बाबासाहेब कंधारे, मुळशी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुखदेव मांडेकर, माऊली कांबळे, सचिन अमराळे, विलास अमराळे, कासार आंबोली सरपंच माधुरी धुमाळ, एकनाथ सुतार, प्रकाश सुतार, शशिकांत नागरे, पोलीस पाटील स्वाती सुतार, निता नागरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश सुतार, माजी सरपंच गणेश सुतार, महेश मानकर, सुरज सुतार, समीर सुतार, आशिष वाडकर, उरवडे केंद्राच्या केंद्रप्रमुख वैजयंता देशमुख मॅडम, मुख्याध्यापिका ओहळे मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद , विद्यार्थी व आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ढोल-ताशांच्या गजरात आमदार मांडेकर यांचे स्वागत करण्यात आले. शाळेतील विद्यार्थिनींनी त्यांचे औक्षण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उबाळे सर यांनी केले. शिक्षक मोहन भगत यांनी याच कार्यक्रमासाठी लिहिलेली कविता विद्यार्थिनी पूर्वा खेडेकर हिने रसपूर्वक सादर केली.
शाळेचा वाढता विद्यार्थी संख्येचा पट पाहून आमदार मांडेकर यांनी समाधान व्यक्त केले व शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत शाळेस लागणारी मदत निवेदनाद्वारे मागावी, असे आवाहन केले. यावेळी शाळेला वेळोवेळी मदत करणाऱ्या कोटक एज्युकेशन फाऊंडेशनच्या सानी सर आणि श्वेता मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.
या उपक्रमासाठी योगेश सुतार, निलेश सुतार, सचिन सुतार यांचे विशेष योगदान लाभले. तसेच सोनेरी मुळशी मित्र परिवार, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, सुतारवाडी ग्रामस्थ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.


































