मुळशी (पिरंगुट, ता.१७) : मुळशी तालुक्यातील उरवडे ते मुठा दरम्यान असलेला मुठा घाटातील रस्ता सततच्या मुसळधार पावसामुळे खचल्याने या मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. राज्य मार्ग क्रमांक ११५ वरील हा रस्ता घोटावडे फाटा, उरवडे येथून मुठा व लावासा दिशेने जातो. सध्या या मार्गावरील प्रवास अत्यंत धोकादायक झाला असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मागील दोन-तीन दिवसांपासून मुळशी तालुक्यात ढगफुटीला साजेसा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुठा घाट, मुठा गाव व मोरेवाडी परिसरात पाण्याचे लोट वाहताना दिसले. अनेक घरांत पाणी शिरले असून, शेतमाल मोठे नुकसान झाले आहे.
घाटात काही ठिकाणी अवैध उत्खनन झाल्याने पावसाचे नैसर्गिक प्रवाह बदलले असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट तयार होत आहेत. दोन दिवसांपूर्वीच पाण्याबरोबर माती व दगड वाहून आल्याने घाटात वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने सूचना दिल्यानंतर घाटात खचलेल्या रस्त्यावर भराव टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
स्थानिक प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घाटातील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


























