मुळशी (लवळे) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत लवळे येथे एकल महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, दिव्यांग आणि इतर नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी ऑनलाईन सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती मुळशीचे विस्तार अधिकारी श्री. महादेव पंढरीनाथ चव्हाण यांच्या शुभहस्ते झाले.
शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य आणि महा-ई-सेवा केंद्र या विभागांच्या मदतीने गावातील नागरिकांना विविध ऑनलाइन सेवा देण्यात आल्या. सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ राज्यसेवा योजना तसेच त्यासाठी लागणारे उत्पन्न व जातीचे दाखले उपलब्ध करून देण्यात आले.
याशिवाय दिव्यांग लाभ, आयुष्मान भारत कार्ड, मनरेगा योजनेअंतर्गत जॉब कार्ड तयार करणे, सौरऊर्जेअंतर्गत सूर्यघर व सोलर पंपासाठी अर्ज भरणे, कृषी योजनांसाठी अर्ज सादर करणे, तसेच निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड अद्ययावत करणे आणि जन्म-मृत्यू नोंदणी यांसारख्या सेवा शिबिरात देण्यात आल्या. एकूण 292 लाभार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

या स्तुत्य उपक्रमाचे श्री. चव्हाण यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच श्री. रणजीत राऊत हे होते. या प्रसंगी उपसरपंच श्री. शिवराम सातव, सदस्य श्री. संजय सातव, अजित चांदिलकर, बाळू राऊत, राणीताई केदारी, किमया गावडे, सायली सातव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाला श्री. सुपेकर (मंडल कृषी अधिकारी), श्री. गणेश तांदळे (कृषी सहाय्यक), श्री. चंद्रकांत शेकडे (आरोग्य सेवक), सौ. सोनाली सातव व रंजना चव्हाण (आशा वर्कर) तसेच सुशासन युक्त समितीचे गटप्रमुख श्री. धनंजय कुदळे, सदस्य श्री. दीप सातव, श्री. सतीश आल्हाट, ग्रामस्थ धोंडिभाऊ केदारी, दशरथ गावडे, रोटमलनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, माजी सरपंच सौ. वैशाली सातव व कैलास आल्हाट उपस्थित होते.
माननीय श्री. ढोरे, श्री. संजय सातव व श्री. रणजीत राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी श्री. व्हि. डी. साकोरे यांनी केले, तर सदस्य श्री. बाळू राऊत यांनी सर्वांचे आभार मानले.

या उपक्रमामुळे गावातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी सुलभपणे मिळाला असून ग्रामपंचायतीच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
































