राष्ट्रीय पातळीवर अमेझॉन वेब सर्व्हिसेसकडून तांत्रिक शिक्षणातील योगदानाची दखल
पुणे : भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाने तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रात आणखी एक मानाचा टप्पा गाठत ‘अमेझॉन वेब सर्व्हिसेस’ (AWS) तर्फे दिला जाणारा ‘टेक अलायन्स क्लाउड चॅम्पियन अवॉर्ड’ नुकताच प्राप्त केला. ‘स्किल्स टू जॉब्स अँड टेक अलायन्स इंडिया’चे प्रमुख मा. डी. पी. सिंग यांच्या हस्ते महाविद्यालयाला हा सन्मान प्रदान करण्यात आला.
महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली क्लाउड कम्प्युटिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थिनींसाठी नवनवीन संधी निर्माण करण्यात आल्या. सन २०१९ पासून अमेझॉन वेब सर्व्हिसेससोबत भागीदारी करत विद्यार्थिनींसाठी क्लाउड कम्प्युटिंग अभ्यासक्रम, प्रमाणपत्र आधारित प्रशिक्षण आणि उद्योग संलग्न शिक्षणाच्या माध्यमातून कौशल्यविकासावर भर देण्यात आला. या उपक्रमाचे समन्वयन डॉ. सोनाली कदम यांनी केले.
‘टेक अलायन्स’ उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी स्किल मॅप अभ्यासक्रम, हॅकाथॉनसारखे उपक्रम यामध्ये भाग घेऊन आपली कौशल्ये सिद्ध केली आहेत. प्रशिक्षणानंतर विद्यार्थिनींना मिळालेली नोकरी संधी, प्राप्त झालेली प्रमाणपत्रे आणि उद्योग क्षेत्राकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद या यशामागील ठळक बाबी ठरल्या.
अमेझॉन वेब सर्व्हिसेसकडून या गौरवाबाबत महाविद्यालयाच्या कार्यक्षमतेचे कौतुक करण्यात आले असून, “संस्थेने क्लाउड क्षेत्रात काम करण्यास सज्ज असे कौशल्ययुक्त कार्यबल घडवले असून तांत्रिक शिक्षणाचे नवे मानदंड निश्चित केले आहेत,” असे संस्थेचे मत आहे.
या यशामागे भारती विद्यापीठाचे सततचे मार्गदर्शन आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आहे. विद्यापीठाचे कार्यवाह व प्र-कुलगुरू मा. डॉ. विश्वजीत कदम यांचे नेतृत्व, कुलपती मा. प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांची शैक्षणिक तत्त्वनिष्ठा, कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांची प्रेरणा आणि शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा मा. सौ. विजयमाला कदम यांचा महिला शिक्षणावरील दृढ विश्वास हे घटक या यशामागे महत्त्वाचे ठरले आहेत. तसेच सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव यांचे प्रशासकीय मार्गदर्शनही उल्लेखनीय ठरले आहे.
हा पुरस्कार केवळ एक सन्मान नसून, महिलांना तांत्रिक शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनवण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांची दखल म्हणून पाहिला जात आहे.
































