५०० हून अधिक दिव्यांगांना विविध सेवांचा लाभ; जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने विशेष शिबीर
पुणे, (दि.३०) : दिव्यांग बालकांसाठी आता वैद्यकीय मूल्यमापनासाठी घरपोच सेवा उपलब्ध होणार असून, त्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांनी केले आहे. दिव्यांगत्वामुळे हालचाल करू न शकणाऱ्या बालकांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे.
उच्च न्यायालयाच्या किशोर न्याय समिती व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने बाल कल्याण संस्था, गणेशखिंड येथे दिव्यांग नागरिकांसाठी विशेष सशक्तीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (दि. २८) पार पडलेल्या या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी न्यायाधीश महाजन बोलत होते.
या वेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील, दिव्यांग आयुक्तालयाचे आयुक्त प्रवीण पुरी, बाल कल्याण संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार, दिव्यांग भवन पिंपरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, सहाय्यक आयुक्त संगीता डावखर आदी मान्यवर उपस्थित होते.
“प्रत्येक दिव्यांग मुलाला शिकण्याची आणि यशस्वी होण्याची संधी मिळावी, हा आपला अधिकार आहे. कोणतेही दिव्यांग बालक दुर्लक्षित राहू नये, यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत,” असे मत न्यायाधीश महाजन यांनी व्यक्त केले.
दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्न – सोनल पाटील
दिव्यांग मुलांचा समाजात सर्व स्तरांमध्ये समावेश करून त्यांचे सक्षमीकरण करणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी मांडले. “या शिबिरातून न्याय व्यवस्था, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था एकत्र आल्याने दिव्यांगांसाठी एक प्रभावी पाऊल उचलले गेले,” असे त्या म्हणाल्या.
या शिबिरात १०० हून अधिक दिव्यांग बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व त्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तसेच ५०० पेक्षा अधिक लाभार्थ्यांना विविध कायदेशीर, वैद्यकीय आणि कल्याणकारी सेवा पुरविण्यात आल्या.
या सेवांमध्ये समुपदेशन, पालकांसाठी मार्गदर्शन, आधार कार्ड नोंदणी, मोफत कायदेशीर सल्ला, शासकीय योजनांची माहिती, शिष्यवृत्ती योजना आणि राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या सुविधा आदींचा समावेश होता.
विशेष वैद्यकीय तपासणी आणि सामाजिक सहभाग
औंध जिल्हा रुग्णालय आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी यांच्या डॉक्टर पथकांनी विविध प्रकारच्या दिव्यांगत्वांचे निदान केले. यात अंधत्व, श्रवण दोष, बौद्धिक दिव्यांगत्व, मानसिक आजार, सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकल सेल, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, शिकण्याच्या अडचणी आदींचा समावेश होता.
शिबिरात सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग दिसून आला. बाल कल्याण संस्था, ॲक्शन फॉर इम्पॅक्ट फाउंडेशन, एकांश ट्रस्ट, सप्तऋषी फाउंडेशनने आधार कार्ड नोंदणी, समुपदेशन तर जैन डिव्हाईन ग्रुपने व्हीलचेअर आणि स्कूल बॅग वाटप करून दिव्यांग बालकांचा उत्साह वाढवला.


























