कॅनडाच्या बर्नार्ड टॉन्क्स यांचे मार्गदर्शन
पुणे दि. २२ : भारती विद्यापीठाच्या धनकवडी शैक्षणिक संकुलातील स्कूल ऑफ फिजिओथेरपीच्या वतीने “व्हेस्टीब्युलर रिहॅबिलिटेशन” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. व्हेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन किंवा पुनर्वसन ही एक विशेष फिजिओथेरपी उपचार पद्धती आहे ज्यामध्ये वारंवार चक्कर येणे, व्हर्टिगो, मायग्रेन, त्यामुळे दृष्टीला जाणवणारी धूसरता, चालताना जाणवणारी अस्थिरता किंवा तोल जाणे, डोके बधिर व जड वाटणे आणि त्यामुळे शरीराचे संतुलन बिघडणे अशा समस्यांवर ही उपचार पद्धती मदत करते.
ही समस्या कानातील संतुलन व्यवस्था म्हणजेच व्हेस्टिब्युलर सिस्टीम आणि मेंदूतील व्यवस्थेचे संतुलन यांचा समन्वय बिघडल्यामुळे होते. या कार्यशाळेत चर्चासत्र व्हेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन या विषयातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ बर्नार्ड टॉन्क्स (BScPT, FCAMPT) यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या सत्रात न्यूरो फिजिओथेरपी तज्ञ डॉ. प्रीती जडिया यांचे सहकार्य लाभले. कार्यशाळेस भारती विद्यापीठ आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डेप्युटी मेडिकल डायरेक्टर डॉ. जितेंद्र ओसवाल, स्कूल ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्या डॉ. स्वाती भिसे उपस्थित होते. या कार्यशाळेत व्हेस्टिब्युलर सिस्टीमची रचना व त्याचा मेंदूशी समन्वय, त्याचे विकार, चक्कर येण्याची भिन्न निदान पद्धती, व्हर्टिगोचे मूल्यमापन आणि उपचार पद्धतीची प्रात्यक्षिके यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश करण्यात आला. विविध फिजिओथेरपीस्ट, स्पीच अँड लँग्वेज ऑडिओलॉजिस्ट, फिजिशियन्स अशा एकूण ३५ तज्ज्ञांनी कार्यशाळेसाठी सहभाग नोंदवला. डॉ. शरयू अग्रे, डॉ. नीरज आठवले, डॉ. श्रुती पांढरकर, डॉ. सुशील कुमार, डॉ. फराह मेमन यांनी कार्यशाळेची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.

























