हिंजवडीत मुसळधार पावसाने उघड केल्या पायाभूत समस्या; नागरिक त्रस्त, प्रशासनाकडे सवालांची सरबत्ती
मुळशी (हिंजवडी दि.19) : मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हिंजवडी आयटी पार्क परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या अविरत पावसामुळे आयटी पार्कमधील रस्ते पाण्याखाली गेले असून, वाहतूक ठप्प होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. परिणामी, नागरिक आणि आयटी कर्मचाऱ्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
सहाच नाही, तर सात किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा!
दररोज सकाळी आणि संध्याकाळी आयटी पार्क परिसरातील सर्वच प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. अनेक ठिकाणी सहा ते सात किलोमीटरपर्यंत ही कोंडी पसरते. त्यामुळे वेळेवर ऑफिस गाठणं आव्हानात्मक ठरतंय. स्थानिक नागरिक आणि आयटी प्रोफेशनल्समध्ये प्रशासनाविषयी नाराजीचा सूर चढताना दिसतो आहे.

पावसाने उघड केल्या व्यवस्थेच्या त्रुटी
मे अखेरीस वादळी वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसानंतर सुरू झालेला मान्सून हिंजवडी परिसरात दमदार बॅटिंग करत आहे. या पावसामुळे येथील पायाभूत सुविधांची दयनीय अवस्था समोर आली आहे. रस्त्यांवरील खड्डे, जलनिचऱ्याची दुर्लक्षित यंत्रणा आणि वाहतुकीचा गोंधळ सध्या नागरिकांच्या नशिबी आलेला त्रास ठरतोय.
हिंजवडी परिसरातील प्रमुख अडचणी :
- कायमस्वरूपी खड्डेमय रस्ते
- संथगतीने सुरू असलेलं मेट्रोचे काम
- लेन मार्किंगचा अभाव
- अवजड वाहनांची दिवसभर वर्दळ
- बेशिस्त आणि अनियंत्रित वाहतूक
- अपुऱ्या मनुष्यबळाचे वाहतूक पोलीस
- नष्ट झालेले नैसर्गिक ओढे, वगळ
- जलप्रवाह मार्गांवरील अतिक्रमण
- चोकअप झालेली स्टॉर्म वॉटर ड्रेनेज
- पाण्याचा निचरा करणाऱ्या उपाययोजनांचा अभाव
- भौगोलिक रचनेची अवहेलना करत केलेले रस्ते नियोजन
- प्रशासन यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव
‘पाणी साचते, कोंडी वाढते’
फेज तीनकडील डोंगर-पठार भाग, फेज तीन ते फेज दोन मुख्य रस्ता, पद्मभूषण चौक, गवारे मळा, माणदेवी चौक, राक्षे वस्ती, बोडकेवाडी फाटा, शिवचा ओढा, वडजाईनगर, जॉय व्हिला रस्ता, धुमाळ वस्ती, विनोदे वस्ती, भटेवारानगर आणि भूमकर चौक अंडरपास या भागात पावसाचे पाणी साचून राहते. परिणामी वाहतुकीचा संपूर्ण बोजवारा उडतो.

नागरिकांच्या प्रतिक्रिया :
“प्रामुख्याने वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना आवश्यक आहेत. तसेच, बाराही महिने रस्ते सुस्थितीत ठेवले गेले पाहिजेत. रहदारीच्या वेळी वाहतूक पोलिसांची उपस्थिती गरजेची आहे.” : अनुप मोरे, (आयटी अभियंता, हिंजवडी)
“सुमारे ६० टक्के आयटी पार्कचा भाग माण ग्रामपंचायत हद्दीत येतो. एमआयडीसी हद्दीतील रस्त्यांचीही दुरवस्था आहे. कचरा आणि सांडपाणी समस्येकडे प्रशासन वारंवार पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष करतंय.”: अर्चना आढाव, (सरपंच, आयटीनगरी माण)

प्रशासन झोपेचं सोंग घेणार की धडा शिकणार?
हिंजवडी आयटी पार्क परिसरातील रोजच्या रोज जाणवणाऱ्या समस्यांवर अद्याप ठोस उपाययोजना झाल्या नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेकडे संशयाने पाहिले जात आहे. आता तरी वरुणराजाच्या कोपातून धडा घेऊन प्रशासन जागं होणार का? की नागरिकांचा त्रास असाच चालू राहणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.


























