पुणे (बावधन) : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्री-प्रायमरी विभागात पितृ दिन मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. वडील आणि मुलांमधील नात्याला नवे रंग देणाऱ्या या खास कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे वडील स्वतः सहभागी झाले आणि आपल्या मुलांसोबत खास क्षण घालवले.
या वेळी खेळ, गाणी, गोड गप्पा यांचा मनमुराद आनंद लुटण्यात आला. आपल्या लहानग्यांसोबत मोकळेपणाने खेळताना वडिलांचे चेहरे हसरे आणि समाधानाने उजळले होते. कार्यक्रमानंतर अनेक वडिलांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

या कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, संचालिका कु. शिवानी बांदल आणि मुख्याध्यापिका सौ. शुभदा कोलते यांनी केले. कार्यक्रमाचे सुरेख नियोजन प्री-प्रायमरी विभागाच्या पर्यवेक्षक श्रीमती शिरीन काझी यांनी केले होते. तसेच, सर्व शिक्षकांनी सजावटीत आणि कार्यक्रम सादरीकरणात आपली सर्जनशीलता दाखवत वातावरण रंगतदार केले.
“वडिलांसाठी एक दिवस पुरेसा नाही, त्यांच्यामुळेच आपले प्रत्येक क्षण खास असतात. हे नाते अधिक घट्ट व्हावे म्हणून आम्ही फक्त एक माध्यम झालो,” असा भावस्पर्शी संदेश शाळेकडून देण्यात आला.
हा विशेष दिवस प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या वडिलांसाठी खरंच अविस्मरणीय ठरला.


























