पुणे (बावधन) : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, बावधन येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात व ऊर्जा भरलेल्या वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी यंदाच्या योग दिनाची थीम “स्वतःसाठी आणि समाजासाठी योग” या संदेशावर विशेष भर देण्यात आला.
या विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शंकरराव जनार्दन आवाळे (योग व आयुर्वेद डिप्लोमा, टिळक महाराष्ट्र विद्यालय), श्री. ढमढेरे सर (उद्योजक), सौ. स्मिता बोकील, सौ. जया कुलकर्णी व सौ. शुभांगी कुलकर्णी उपस्थित होते.
श्री. आवाळे सरांच्या मार्गदर्शनाखाली पालक, शिक्षक, विद्यार्थी व शाळेचे अध्यक्ष यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यान यांचा सराव केला. त्यांनी जलनेती व रबरनेती यांचे प्रात्यक्षिक देखील करून दाखवले व योगाचे शारीरिक-मानसिक फायदे सोप्या भाषेत समजावून सांगितले.

शाळेच्या विद्यार्थ्यांनीही चक्रासन, वक्रासन, शीर्षासन, धनुरासन यांसारखी योगासने सादर करत आपले कौशल्य दाखवले. शाळेच्या प्रांगणात आयोजित सामूहिक योग सत्रात सर्व वर्गातील विद्यार्थी, शिक्षक, पालक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे संचालक श्री. राजेंद्र बांदल यांनी सांगितले की, “योग हे केवळ शरीरासाठी नाही, तर मन व आत्म्याच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. योग शिस्त, एकाग्रता व सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि यशस्वी जीवनाचा मार्ग दर्शवतो.”
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभदा कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. सौ. प्रज्ञा जोशी, सौ. शिरीन काझी व कु. सायली गायकवाड यांनी संयोजनात विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचा समारोप “दररोज योग करा आणि योगाचा प्रसार करा” या संकल्पाने करण्यात आला.
या योग दिनानिमित्ताने पेरिविंकल शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबतची आपली बांधिलकी अधोरेखित केली, तसेच भारतीय योग परंपरेचे जागतिक महत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवले.


























