हिंगोली ते रिसोड मार्गावर खुडज पाटीजवळ विना परवाना वाहतुक केले जाणारे सागवान व एक टेम्पो वन विभागाच्या पथकाने रविवारी ता. १५ रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पकडला आहे. या प्रकरणी पुढील कारवाई केली जात असल्याचे वन विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
?
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हयातील जिंतूर येथील एका व्यक्तीने सेनगाव तालुक्यातील खुडज येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील सागवानाची झाडे खरेदी केली. मात्र झाडे तोडण्याची व वाहतुकीची परवानगी न घेता संबंधित व्यापाऱ्याने झाडे तोडून त्याची वाहतूक करण्यासाठी एका टेम्पो मधे सागवान भरले होते.
या संदर्भातील माहिती मिळाल्यानंतर विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे, सहाय्यक विभागीय वन अधिकारी सचिन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जी. पी. मिसाळ, वनरक्षक विशाल मुदीराज यांच्या पथकाने रात्रीच्या सुमारास वाहनाची तपासणी सुरु केली. यावेळी खुडज पाटी जवळ एक टेम्पो थांबविण्यात आला. वन विभागाच्या पथकाने टेम्पो चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली तर सागवान वाहतुकीसाठी परवानगी लागते याची माहितीच नसल्याचे त्याने वन विभागाच्या पथकाला सांगितले.
यावरून पथकाने सदर टेम्पो व सागवान ताब्यात घेऊन सेनगाव वन विभागाच्या कार्यालयात आणले आहे. या प्रकरणी पथकाने दोघांची चौकशी सुरु केली अाहे. या टेम्पोमध्ये सुमारे ५० हजाराचे सागवान असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोमवारी ता. १६ टेम्पोतील सागवान काढून त्याची मोजणी केली जाणार आहे. तर खुडज येथील शेतकऱ्याचा जवाब नोंदविला जाणार असल्याचे वन विभागाच्या सुत्रांनी सांगितले.































