जळगाव जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश
?
जळगाव जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या आधीच माजी आमदार गुलाबराव देवकर आणि माजी मंत्री सतीश पाटील हे अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी देखील पक्षातील सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. उमेश पाटील देखील लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आता रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उमेश पाटील हे देखील प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडे सोशल मीडिया द्वारे पाठवला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
पाच माजी आमदारांचा प्रवेश
जळगाव जिल्ह्यातील पाच माजी आमदारांसोबतच धुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज ते मुंबईत राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतील. त्याच वेळी नंदुरबार जिल्ह्यातील जि.प., पं.स.चे काही माजी सदस्यही अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.
धुळे ग्रामीण (कुसुंबा) मतदारसंघातून प्रा. पाटील २००९ मध्ये तत्कालिन मंत्री रोहिदास पाटील यांचा पराभव करून विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी धुळे शहर मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही. त्यामुळे ते स्वगृही काँग्रेस पक्षात परतले होते. पण तिथेही भ्रमनिरास झाल्याने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. आता त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. धुळे येथे कृषिविद्यापीठ व्हावे, या आपल्या मागणीला अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे प्रा. पाटील यांनी सांगितले
आणखी एका माजी आमदाराचे नाव चर्चेत
दरम्यान, धुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या एका माजी आमदारांचे नावही राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशासाठी चर्चेत आहे. मात्र, ते शनिवारी प्रवेश करणार नसून त्यांच्यासाठी वेगळा मुहूर्त असेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यावेळी काँग्रेसचे एक माजी जिल्हाध्यक्ष, एक महिला माजी महापौर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असेही सांगण्यात येते आहे.
जळगाव जिल्ह्यातील यांचा होईल प्रवेश
जळगाव जिल्ह्यातील पाच माजी आमदार मुंबईत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यात गुलाबराव देवकर (जळगाव ग्रामीण), डाॅ. सतीष पाटील (पारोळा),दिलीप वाघ (पाचोरा), कैलास पाटील (चोपडा) आणि दिलीप सोनवणे (विधान परिषद) यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काही कार्यकर्तेही त्यांच्यासमवेत असतील.




























