बजाज चेतक 35: भारतीय नागरिकांची वाहन चालवण्याची शैली, त्यांच्या गरजा आणि देशातील रस्त्यांची एकंदर स्थिती पाहता बजाज कंपनीकडून कायमच या अपेक्षांची पूर्तता करण्यच्या हेतूनं दुचाकी वाहनांची निर्मिती करण्यात आली. आता कंपनीनं इलेक्ट्रीक स्कूटर व्हेरिएंटमध्येही अनेकांना परवडेल असा व्हेरिएंट लाँच केला असून, Chetak 3503 अशी त्याची ओळख.
1 लाख 10 हजार रुपये (एक्स शोरूम) अशी या स्कूटरची किंमत. या सीरिजच्या 3501 आणि 3502 अशा दोन स्कूटर यापूर्वीच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आता या स्कूटरचं 3501 हे व्हेरिएंट तब्बल 20 हजार रुपयांनी कमी दरा विक्रीसाठी उपलब्ध आहे.
आता किती रुपयांना विकली जाणार ही स्कूटर?
मागच्याच वर्षी डिसेंबर महिन्यात बजाज ऑटोनं चेतक 35 सीरिजमधील 3501 आणि 3502 या स्कूटर भारतीय ऑटो क्षेत्रात लाँच केल्या होत्या. अनुक्रमे या स्कूटरसाठी 1,29,743 आणि 1,22,499 इतकी रक्कम मोजावी लागत होती. नुकतंच लाँच झालेलं स्कूटरचं नवं मॉडेल यापूर्वीच्या मॉडेलमागोमागच विक्रीसाठी उपलब्ध झाल्यानं 3501 हे पहिलं मॉडेल आता 20 हजार रुपयांनी स्वस्त करण्यात आलं आहे. त्यामुळं एका चांगल्या लूकची स्कूटर हवी झाल्यास बजाजची ही चेतक एक उत्तम पर्याय ठरू शकते.
चेतकच्या नव्या व्हेरिएंटमध्ये इतकं खास काय?
बजाजच्या या नव्या स्कूटरला नवं चेसिस आणि आधीप्रमाणंच बॅटरी बॅकअप देण्यात आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे महागड्या मॉडेलना मिळणारा बॅटरी बॅकअप असल्यानं ही स्कूटर अनेकांच्याच पसंतीस उतरू शकते. या स्कूटरची किंमत अनेकांच्याच खिशाला परवडण्याजोगी बनवण्यासाठी काही अॅडवान्स फिचर मात्र त्यात देण्यात आलेले नाहीत.
बजाजच्या अधिकृत संकेतस्थळावर कंपनीच्या या नव्या स्कूटरविषयीची माहिती देण्यात आली आहे. लूक आणि डिझाईनच्या बाबतीत कंपनीनं जवळपास याआधीच्याच मॉडेलप्रमाणं ही स्कूटर डिझाईन केली आहे. ज्यामध्ये 35 लीटरचा अंडर सीट स्टोरेज स्पेस मिळतो.
स्कूटरला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. स्कूटरची बॅटरी 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यासाठी 3 तास 25 मिनिटांचा वेळ लागतो. या स्कूटरमध्ये सीक्वेंशिअल इंडिकेटर नसून, त्यात ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. इको आणि स्पोर्ट्स असे दोन रायडिंग मोड या स्कूटरला देण्यात आले आहेत. याशिवाय हिल होल्ड असिस्ट, फुल मेटल बॉडीसह ही स्कूटर चार रंगांमध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. ज्यामध्ये इंडिगो ब्लू, ब्रुकलिन ब्लॅक, सायबर व्हाईट आणि मॅट ग्रे अशा रंगांचा समावेश आहे.
Chetak 3503 मध्ये 3.5 kWH क्षमतेचं बॅटरी पॅक देण्यात आलं असून, ते सिंगल चार्जमध्ये 155 किमी पर्यंतची ड्रायविंग रेंज देतं. या स्कूटरमध्ये कंपनीनं टॉप स्पीडमध्ये घट केली असून, ही क्षमता 63 किमी प्रतितासापर्यंक आणली आहे. काही बेसिक फिचर, परवडणारी किंमत आणि समाधानकारक बॅटरी बॅकअपसाठी ही स्कूटर शहरी वापरासाठी एक उत्तम पर्याय आहे. किमान गरजा भागवण्यासाठी आणि थोड्या अंतरासाठीच्या प्रवासासाठीसुद्धा या स्कूटरला निवडणं गैर ठरणार नाही.






























