Crime News मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातून चोरलेला मोबाईल जप्त केला आहे. स्मार्टफोन ही काळाची गरज झाली आहे. आज हातावारील या पाच इंचाच्या स्क्रीनवर सारं जग सामावलं आहे. हल्ली अगदी दहा हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंतच स्मार्टफोन वापरणारे लोक आहेत. मात्र मुंबईसारख्या शहरांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन फोनवर डल्ला मारणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मुंबईत मोबाईल फोन चोरीचं प्रमाण बरचं अधिक आहे. रेल्वे स्थानक, बस, सार्वजनिक वाहतूक सेवा असो किंवा मॉल, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये असो मोबाईल कुठूनही लंपास केला जाऊ शकतो. त्यातही मुंबईसारख्या शहरात एकदा मोबाईल चोरीला गेला की तो परत मिळणं कठीण मानलं जातं. मात्र मुंबई पोलिसांनी मोबाईल चोरीला गेलेल्यांना एक सुखद धक्का दिला असून तब्बल 2 कोटी रुपयांचे 1650 चोरीला गेलेले स्मार्टफोन बिहारमधून जप्त केले आहेत. मुंबईतून चोरलेले हे फोन पोलीस आता पुन्हा मूळ मालकांना परत करणार आहेत.
नेमकी काय माहिती दिली मुंबई पोलिसांनी?
“मुंबईत हरवले आणि उत्तर प्रदेशात सापडले. 1650 फोन पुन्हा मुंबईत आणण्यात आले,” अशी कॅप्शनसहीत मुंबई पोलिसांच्या अधिकृत हॅण्डलवर उत्तर प्रदेशमधून परत आणलेल्या मोबाईल्सचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. “विशेष मोहिमेअंतर्गत 2 कोटींच्या आसपास एकूण किंमत असलेले आणि मुंबईमधून चोरीला गेलेले 1650 मोबाईल फोन उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या भागातून पुन्हा मुंबईत आणण्यात आले आहेत,” असंही पोलिसांनी शेअर केलेल्या फोटो कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. “आतापर्यंत मुंबई पोलिसांनी 33 हजार 514 हरवलेले मोबाईल फोन मूळ मालकांना विशेष मोहिमेअंतर्गत परत केले आहेत,” अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
मुंबईत हरवले.
उत्तर प्रदेशात सापडले.
1,650 फोन घरी परत आणले.एका विशेष मोहिमेअंतर्गत, मुंबईत हरवलेले किंवा चोरीला गेलेले अंदाजे ₹2 कोटी किमतीचे 1,650 मोबाईल फोन उत्तर प्रदेशच्या विविध भागातून जप्त करण्यात आले आहेत.
एकूण 33,514 मोबाईल फोन… pic.twitter.com/W9LdysYMBe— मुंबई पोलीस Mumbai Police (@MumbaiPolice) 10 जानेवारी 2026
कसे शोधले हे फोन?
दूरसंचार विभागाच्या अंतर्गत असलेल्या सीईआयआर (CEIR) या पोर्टलद्वारे आयएमईआय (IMEI) क्रमांकांच्या माध्यमातून या फोनचा शोध घेण्यात आला. या आंतरराज्यीय कारवाईला मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी मंजुरी दिली होती. जप्त केलेले फोन पडताळणीनंतर मूळ मालकांना परत केले जात आहेत. विशेष म्हणजे अनेक फोन चोरीला गेल्यानंतर महिन्यांनी परत मिळाले आहेत. याचा अर्थ असा की फोन चोरीला गेल्यानंतर बराच काळ त्यांना ट्रॅक करता येतं.
राज्याचा उल्लेख करण्यात आल्यावरुन दुमत
मात्र आता या पोस्टनंतर फोन कुठून मिळाले याचा उल्लेख टाळता आला असता असं म्हटलं आहे.

तर अनेकांनी उत्तर प्रदेशामध्येच हा चोरलेला माल कसा पोहोचतो असा सवाल उपस्थित केला आहे. “मुंबईतून चोरीला गेलेले 1650 फोन उत्तर प्रदेशमध्ये सापडले. आणि उत्तर भारतीयांना मुंबईत येऊन निवडणूक लढवून मुंबईचा विकास करायचा आहे. धन्यवाद, मुंबई पोलिसांचे ही महत्वाची बातमी शेअर केल्याबद्दल!” असं एकाने या पोस्टवर कमेंट करताना म्हटलं आहे.

दरम्यान, हरवलेला मोबाईल तातडीने परत मिळवायचा असेल तर फोन हरवल्यानंतर लवकरात लवकर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची रितसर तक्रार नोंदवणं आवश्यक असतं हे सर्वसामान्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे.





























