Pariksha Pe Charcha 2026 Registration: दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’कडे यंदा महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी पाठ फिरवली आहे की काय? असा सवाल उपस्थित केला जातोय. पंतप्रधान मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमासाठी विद्यार्थी नोंदणीसाठी सध्या शिक्षण विभागाची धावाधाव सुरू आहे. या कार्यक्रमासाठी राज्याला 65 लाख विद्यार्थी, शिक्षक पालकांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले असताना याच्या पाच टक्के उद्दिष्टही पूर्ण झालेलं नाही. आतापर्यंत केवळ जेमतेम पावणेतीन लाखच नोंदणी झाल्याने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे आहे.
कुठे आणि कशी होते नोंदणी?
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी या बाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षकांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. ‘परीक्षा पे चर्चा 9’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 1 डिसेंबर ते 11 जानेवारी या कालावधीत innovateindia.mygov.in या संकेतस्थळावर इयत्ता सहावी ते बारावीचे विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी ऑनलाइन ‘एमसीक्यू’ पद्धतीची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही माहिती यापूर्वी 3 आणि 8 डिसेंबरच्या परिपत्रकाद्वारे कळवण्यात आली होती. ती माहिती विभागातील, जिल्ह्यातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या निदर्शनास पुन्हा आणून देऊन आणि पालक, एकूण 65 लाख विद्यार्थी, शिक्षक सहभागी होण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. मात्र, 22 डिसेंबरपर्यंत केवळ 2 लाख 78 हजार 535 जणांचीच नोंदणी झाली आहे. याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सहसचिवांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे डॉ. पालकर यांनी नमूद केले आहे.
कधीपासून आयोजित केली जात आहे, ‘परीक्षा पे चर्चा’?
‘परीक्षा पे चर्चा’ मोहीम 2018 मध्ये सुरू झाली आणि दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात आयोजित केली जाते. पहिल्या आवृत्तीपासून ते आतापर्यंत (2025 पर्यंत) ही चर्चा दिल्लीतील भारत मंडपम किंवा इतर ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये लाखो विद्यार्थी, पालक आणि शिक्षक भाग घेतात. 2025 च्या आवृत्तीत पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना तणावावर मात करण्याचे मंत्र दिले होते. या कार्यक्रमात विद्यार्थी पंतप्रधानांना थेट प्रश्न विचारू शकतात, आणि ते उत्तर देतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर होतात. कार्यक्रम ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने आयोजित केला जातो, आणि तो दूरदर्शन, यूट्यूब आणि इतर माध्यमांवर थेट प्रसारित केला जातो.





















