ग्रामीण भागातील रुग्णांना डायलिसिसकरिता जिल्हा स्तरावर करावी लागणारी पायपीट आता थांबली आहे. तिवसा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस केंद्र उभारण्यात आले असून, शुक्रवारी प्रथमच ग्रामीण भागातील एका रुग्णावर यशस्वी डायलिसिस करण्यात आले. त्यामुळे गोरगरीब सर्व डायलिसिस रुग्णांना या सेंटरमुळे मोफत लाभ मिळण्यासोबतच हजारो रुपयांचा खर्च देखील वाचणार आहे.
तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण ८ बेडचे डायलिसिस सेंटर कार्यान्वित झाले असून, रघुनाथपूर येथील गजानन चरपे या पहिल्या रुग्णाचे डायलिसिस या सेंटरवर शुक्रवारी यशस्वीरित्या पार पडले. स्थानिक रुग्णालयात रुग्णांना मोफत उपचार मिळतात. त्यामध्ये आता मोठी भर पडली असून डायलिसिस रुग्णांना उपचारासाठी इतरत्र होणारे हेलपाटे, पायपीट व हजारो रुपयांचा खर्चही या सुविधेमुळे वाचणार आहे. डायलिसिसकरिता किमान एकदा तरी जिल्हा स्तरावरील रुग्णालय गाठून त्यासाठी रुग्णांना तीन ते चार हजार रुपये खर्च करावे लागत होते. मात्र, आता शासनाने तालुका स्तरावरच डायलिसिस सेंटर कार्यान्वित केल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
संक्रमित रुग्णांसाठी राखीव बेड एचआयव्ही अथवा हिपॅटायटिस अशा संक्रमित रुग्णांसाठी तिवसा येथील रुग्णालयातील डायलिसिस सेंटरवर राखीव बेडची व्यवस्था ठेवण्यात आली आहे, हे विशेष.
गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा
उपजिल्हा रुग्णालयात सद्य:स्थितीत ८ बेडचे डायलिसिस युनिट उभारण्यात आले आहे. त्याशिवाय अद्ययावत ८ डायलिसिस मशीन उपलब्ध आहेत. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. काकडे ( किडनी विकार तज्ञ) यांच्या मार्गदर्शनात डायलिसिस टीममधील १ नर्सिंग स्टाफ, २ डायलिसिस तंत्रज्ञ व १ हाऊसकिपर यांच्या सोबत मिळून कर्तव्य बजावत आहेत. या मोफत आरोग्य सेवेचा रुग्णांनी लाभ घ्यावा.-डॉ शिवराज माने, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, तिवसा.































