आधार कार्ड नंबर निष्क्रिय का: कोणतंही कागदोपत्री काम म्हटलं की आधी विचारली जाणारी गोष्ट म्हणजे आधार कार्ड! मात्र आपल्यापैकी फारच कमी लोकांना याची कल्पना असते की आधार नंबर देखील निष्क्रिय म्हणजेच डिअॅक्टीव्ह केले जातात. म्हणजेच तुमचा आधार कार्ड नंबर देखील डिअॅक्टीव्हेट होऊ शकतो. अर्थात आता हा असा प्रकार अनेक कारणांमुळे होऊ शकतो. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त आधार कार्ड असणे, आधार कार्ड बराच काळ वापरात नसणे, आधार बनवताना चुकीची माहिती दिली जाणे अशा कारणांचा समावेश असू शकतो. जर तुमचे कार्ड देखील निष्क्रिय झालं असेल, तर ते तुम्हाला कसं कळेल? तुम्ही तुमचा आधार क्रमांक निष्क्रिय केला आहे की नाही हे शोधता येतं हे ठाऊक आहे का? जर आधार कार्ड नंबर निष्क्रिय केला असेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
आधार कार्ड क्रमांक सक्रीय आहे की नाही हे कसे तपासायचे?
तुमचा आधार क्रमांक निष्क्रिय केला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी, तुम्हाला तुमच्या फोनवर mAadhaar अॅप डाउनलोड करावं लागेल. तुम्ही mAadhaar अॅपमध्ये आवश्यक ती माहिती भरुन लॉग इन केल्यानंतर तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकलात तर तुमचा आधार नंबर निष्क्रिय झालेला नाही असं समजावं. जर तुमचा आधार क्रमांक निष्क्रिय केला असेल, तर अॅपमध्ये लॉग इन करताच येणार नाही. तुम्हाला काहीतरी तांत्रिक बिघाड असल्याचं सांगितलं जाईल.
सक्रिय कसा कराल हा क्रमांक?
> जर तुमचा आधार क्रमांक निष्क्रिय झाला असेल तर तुम्ही तुमचा आधार क्रमांक सक्रिय करू शकता. यापैकी पहिला मार्ग म्हणजे तुमचा आधार क्रमांक व्हेरिफाय करुन घेणे.
> यासाठी तुम्हाला आधारची अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी लागेल.
> येथे, खाली स्क्रोल केल्यावर, तुम्हाला आधार सेवा नावाचा पर्याय दिसेल.
> या विभागात, तुम्हाला Verify an Aadhaar Number नावाच्या पर्यायावर टॅप करावे लागेल.
> यानंतर, तुम्ही OTP द्वारे लॉग इन करून तुमचा आधार क्रमांक व्हेरिफाय करू शकाल.
> यानंतर, तुमचा आधार क्रमांक पुन्हा सक्रिय झालेला असेल.
1947 वर कॉल करा
जर तुम्ही वर नमूद केलेल्या पद्धतीने तुमचा आधार सक्रिय करू शकला नाहीत तर तुम्ही 1947 या क्रमांकावर कॉल करून मदत घेऊ शकता. 1947 हा UIDAI चा टोल-फ्री हेल्पलाइन नंबर आहे. या नंबरवर तुम्हाला आधारशी संबंधित माहिती, समस्या आणि मदत पुरवली जाते. हा नंबर 24X7 उपलब्ध आहे. तुम्ही कोणत्याही फोनवरून त्यावर मोफत कॉल करू शकता. येथून तुम्ही तुमचा आधार क्रमांक निष्क्रिय का झाला याचं नेमकं कारण आणि ते पुन्हा सक्रीय कसं करायचं हे जाणून घेऊ शकता.
आधार केंद्राला भेट द्या
अनेकदा टोल फ्री नंबरवर देखील, या समस्येशी संबंधित मदत उपलब्ध नसते. जर तुमच्यासोबतही असेच काही घडले, तर शेवटचा पर्याय म्हणजे आधार केंद्राला भेट देणे. येथे तुम्हाला तुमच्या समस्येवर 100 टक्के उपाय मिळेल.





























