पादुकांची शासकीय महापूजा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते… देहू नगरी भक्तिरसात न्हाल्ली!
पुणे (देहू,दि.19) : पंढरपूर वारीच्या प्रस्थानपूर्व काळात देहू नगरीतील अध्यात्मिक वातावरण पुन्हा एकदा भक्तिरसाने न्हालं आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते आज श्री संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पादुकांची शासकीय महापूजा इनामदार वाड्यात संपन्न झाली.
महापूजेनंतर पादुकांचे विधिपूर्वक पाद्यपूजन करण्यात आले आणि आरतीने वातावरण भक्तिमय झालं. यावेळी पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, पोलीस उपायुक्त बापू बांगर, देहू नगर पंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, तसेच ह.भ.प. वैभव, दिलीप, विक्रमसिंह, उमेश आणि लक्ष्मण मोरे या सर्वांचे पूजनात सक्रिय सहभाग होता. पूजेनंतर मंदिर संस्थानच्यावतीने मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला.
दरम्यान, देहू नगरीत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती, मात्र वारकऱ्यांचा उत्साह मात्र पावसापुढे कणभरही कमी झालेला दिसला नाही. टाळ-मृदुंगाच्या गजरात ‘ग्यानबा तुकाराम’, ‘माऊली माऊली’च्या जयघोषात वारकरी भक्तिरसात चिंब भिजलेले दिसले.
डोक्यावर तुळशीवृंदावन, हाती दिंड्या-पताका आणि ओठांवर अभंग… अशा भक्तिमय वातावरणात इनामदार वाड्यातून श्रींची पालखी आकुर्डी मुक्कामासाठी प्रस्थान करून पुढे मार्गस्थ झाली. वारकऱ्यांच्या सागराने देहू नगरी पुन्हा एकदा ‘वारीमय’ केली.































