IND VS SA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND VS SA) यांच्यात रविवार 22 फेब्रुवारी रोजी टी 20 वर्ल्ड कप 2026 मधील (T20 World Cup 2026) सुपर 8 चा सामना पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर दणदणीत विजय मिळवला. रविवारी झालेला सामना हा सुपर 8 फेरीतील दोन्ही संघांचा पहिलाच सामना होता. दक्षिण आफ्रिकेने भारताला विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं होतं, हे आव्हान टीम इंडिया पूर्ण करण्यात अयशस्वी ठरली. यावेळी टीम इंडियाच्या फलंदाजांकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती, मात्र कोणीही भारतासाठी मोठी कामगिरी करू शकलं नाही. शिवम दुबेने शेवटच्या काही ओव्हर्समध्ये मैदानात टिकून फलंदाजी केली, मात्र अपेक्षित फायदा झाला नाही. दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना जिंकल्याने त्यांनी सुपर 8 स्टेजच्या ग्रुप ए च्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवलंय.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करून 7 विकेट गमावून 187 धावा केल्या होत्या. यावेळी डेवॉल्ड ब्रेव्हिसने 45, डेव्हिड मिलरने 63, ट्रिस्टन स्टबने 44 धावा केल्या. तर भारतीय गोलंदाजांपैकी सर्वाधिक तीन विकेट या जसप्रीत बुमराहने घेतल्या, अर्शदीप सिंहने 2 तर वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबेने प्रत्येकी 1 विकेट घेतली. यावेळी दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी 188 धावांचं टार्गेट दिलं होतं.
टीम इंडियाकडून हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी ईशान किशन आणि अभिषेक शर्माची जोडी उतरली, मात्र ईशान किशन पहिल्याच ओव्हरमध्ये डक आउट झाला. त्यानंतर पुढच्याच ओव्हरला तिलक वर्माची विकेट गेली. मग पाचव्या ओव्हरला अभिषेक शर्मा 15 धावा करून बाद झाला, अशी हळूहळू सर्व भारतीय फलंदाज बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतू लागले. एवढ्या कठीण स्थितीत टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सुद्धा समाधानकारक धावा करू शकला नाही आणि अवघ्या 18 धावा करून बाद झाला. तर वॉशिंग्टन सुंदरने 11 धावा केल्या, हार्दिकने 18 तर भारताकडून सर्वाधिक 42 धावा शिवम दुबेने केल्या.
हेही वाचा : IND VS SA : बुमराह का Ego हर्ट नही करना था! आधी चौकार आणि मग पुढच्याच बॉलवर स्टंप उडवले, Video
सुपर 8 च्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजीचं पितळ उघडलं पडलं. कोणताही फलंदाज कठीण प्रसंगी फार काळ मैदानात टिकून राहू शकला नाही आणि बाद झाला. 2019 मध्ये वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या 80 धावांच्या पराभवानंतर, सर्व टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये धावांच्या फरकाने भारताचा हा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. तर 2023 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध याच ठिकाणी झालेल्या पराभवानंतर आयसीसीच्या विविध स्पर्धांमध्ये भारताचा 18 सामन्यांमधील हा पहिला पराभव आहे.
भारताची प्लेईंग 11 :
अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव(कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग 11 :
एडन मार्कराम (विकेटकीप), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.





























