पीएम मोदी एआय डेमो: भारतानं आधुनिक तंत्रज्ञानाच्या या लाटेत सक्रिय सहभाग घेतला असून, जागतिक स्तरावर सध्या देश उल्लेखनीय कामगिरी करताना दिसत आहे. याचीच प्रचिती आली, नुकत्याच पार पडलेल्या एआय समिटमध्ये. इथं आणि यासह अनेक स्तरांवर सध्या Sarvam AI ची बरीच चर्चा सुरू असून, काही दिवसांपूर्वी याच भारतीय बनावटीच्या AI मॉडेलनं OpenAI ChatGPT आणि Google Gemini ला मागे टाकलं होतं. आता हीच कंपनी पहिलं हार्डवेअर डिवाईस जगापुढं आणत असून त्याची पहिली झलकही समोर आली आहे.
सोशल मीडियावर समोर आलाय पंतप्रधानांसह एक खास फोटो…
X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नुकता एक फोटो समोर आला असून, कंपनीचे प्रमुख प्रत्युष कुमार यांनीच हा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी कंपनीकडून आगामी काळात लाँच केल्या जाणाऱ्या या प्रोडक्टची झलकही सर्वांसमोर आणली. AI Impact Summit सुरू असतानाच एक अफलातून प्रोडक्ट जगासमोर आणणाऱ्या या कंपनीनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे.
एका व्हिडीओच्या माध्यातून प्रत्यूष यांनी या स्मार्ट ग्लासेस अर्थात स्मार्ट चष्म्याची झलक दाखवली आहे. Sarvam Kaze असं या प्रोडक्टचं नाव असून ते काहीसं मेटाच्या Meta RayBan सारखीच त्याची रचना आहे. हा स्मार्ट चष्मा वापरणारी पहिलीच व्यक्ती म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं.
कंपनीच्या प्रमुखांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हा स्मार्ट चष्मा पूर्णपणे भारतीय बनावटीचा असून AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेला मोबाईल किंवा संगणकाच्या स्क्रीनपुरता सीमित न ठेवचा दैनंदिन जीवनाताही एक भाग करणं हा यामागचा मुख्य हेतू असल्याचं कुमार यांनी स्पष्ट केलं.
हा चष्मा नेमकं काय करतो?
प्रत्युष कुमार यांच्या माहितीनुसार ‘हा चष्मा तुम्ही लावता तेव्हा, तो तुमचं ऐकतो, तुम्हाला समजून घेतो आणि तुम्हाला उत्तरंही देतो. तुम्ही जे पाहता ते रेकॉर्ड करतो. बरं यातून तुम्ही तुम्हाला हवा तो अनुभवही तयार करू शकता.’
ड्रॉप 12/14: मॉडेल, उत्पादने, प्रभाव – आज काहीतरी वेगळे, खूप वेगळे. सर्वम काझे लाँच करत आहोत, आमच्या डिव्हाइसेससह आमचे मॉडेल तुमच्या हातात आणण्याचा आमचा प्रयत्न – येथे भारतात डिझाइन केलेले आणि तयार केले आहे! pic.twitter.com/8RnqO16Idg
— प्रत्युष कुमार (@pratykumar) १७ फेब्रुवारी २०२६
राहिला मुद्दा ही कमाल गोष्ट लाँच कधी होणार, तर 2026 मध्येच मे महिन्यात हा चष्मा लाँच केला जाणार असून, ते इनहाऊस AI मॉडेलवर काम करेल. दरम्यान, इतकी चर्चा असली तरीही अद्याप या स्मार्ट चष्म्याची किंमत मात्र समोर आली नाहीय.






























