ऑटो न्यूज मारुती कार: भारतीयांच्या वाहनप्रेमात सातत्यानं पसंती मिळवणारी कार कंपनी म्हणजे मारुती. या कंपनीच्या कारना भारतीयांनी बहुतांश वेळा जबरदस्त पसंती देत कारच्या विक्रमी खपामध्येही योगदान दिलं आहे. मात्र, याच कंपनीच्या काही कार अशाही आहेत ज्या या लोकप्रियतेला अपवाद ठरत आहेत. दमदार फिचर्स, मायलेज असतानाही या कारना अपेक्षित यश मिळालं नसून, एक दोन नव्हे तर या यादीत 5 कारचा समावेश आहे.
मारुती जिमनी
गेल्या काही काळापासून मारुतीची Jimny ही ऑफरोडिंग कारसुद्धा विक्रीच्या बाबतीत मागे पडताना दिसत आहे. जानेवारी माहिन्यात या कारच्या फक्त 591 मॉडेलचीच विक्री झाली. 1.5-litre पेट्रोल इंजिन आणि 4×4 क्षमता असणाऱ्या या कारला अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही. ही ऑफरोडर कार एक्स शोरुम 12.31 लाख रुपये इतक्या किमतीला विकली जात असून, त्यामध्ये अनेक फिचरही आहेत. मात्र व्यवहारिकतेमध्ये ही कार मागे पडताना दिसते.
मारुती सेलेरियो
सेलेरिओ ही या सेगमेंटमध्ये सर्वाधिक मायलेज देणारी कार आहे. या कारच्या सीएनजी व्हेरिएंटमध्ये 34.43 km/kg इतकं मायलेज मिळतं. तरीही जानेवारीत या कारच्या 1501 युनिटचीच विक्री झाली आहे. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असणारी सेलेरिओ 4.69 लाख रुपये एक्स शोरुम इतक्या किमतीत उपलब्ध असून एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही कार चांगला पर्याय आहे.
मारुती इन्विक्टो
मारुतीची सर्वात महादडी आणि प्रीमियम 7-seater कार Invicto जानेवारीत फारशी यशस्वी ठरली नसल्याचं पाहायला मिळालं. मागील 6 महिन्यांणध्ये या कारचा सर्वात कमी खप जानेवारीत झाला. टोयोचा इनोव्हा हायक्रॉसच्या धर्तीवर तयार करण्यात आलेली ही कार हायब्रिड इंजिनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. 24.97 लाख इतकं मायलेज असणारी ही कार 23.24 किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते.
मारुती इग्निस
मारुतीच्या नेक्सा डिलरशिपच्या माध्यमातून विक्री केली जाणारी इग्निस ही कारही जानेवारील पिढाडीवर आली. 1.2 लीटरच्या इंजिनसह 20.89 kmpl इतकं मायलेज देणारी ही कार 5.35 लाख रुपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. स्पोर्टी लूक असणारी ही कार तरुणाईचं लक्ष वेधत असली तरीही तिचा खप मात्र समाधानकारक नाही.
मारुती एसप्रेसो
मारुतीच्या सर्वात कमी किमतीच्या आणि दमदार मायलेज देणाऱ्या कारचं नाव आहे S-Presso. 3.49 लाख रुपयांच्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध असणारी ही कार मिनी एसयुव्ही लूक देत असली तरीही जानेवारी महिन्यात या कारचा खप मागे पडला.































