गोविंदावर हल्ल्याचा प्रयत्न बॉलिवूड अभिनेता गोविंदाला गेल्या काही दिवसांपासून धमक्या मिळत असल्याचा खुलासा त्याचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी केला आहे. यावेळी त्यांनी काही अज्ञात हल्लेखोरांनी अभिनेत्यावर त्याच्याच निवासस्थानी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता असाही गौप्यस्फोट केला. मात्र बंदूक आणि फोन असल्यामुळे गोविंदा त्यातून बचावला असा त्यांचा दावा आहे.
“त्याला सतत धमक्यांचे फोन येत असतात. सुदैवाने, ज्या दिवशी त्याच्यावर हल्ला झाला, त्या दिवशी त्याच्याकडे बंदूक होती. त्याने सर्वांना पळवून लावले. नाहीतर देवच जाणे, त्याच्यासोबत काय झालं असतं. मी पहाटे 4 वाजता त्याच्याकडे गेलो होतो. आम्ही एफआयआर देखील दाखल केला आहे. त्या रात्री काय घडले याचा व्हिडिओही आमच्याकडे आहेत,” असं गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी एएनआयला सांगितलं.
शशी सिन्हा यांनी ते नेमक्या कोणत्या घटनेबद्दल बोलत आहेत हे स्पष्ट केलं नसलं तरी, त्यांनी हेदेखील सांगितले की, आत्मसंरक्षणाच्या प्रयत्नात गोविंदाला दुखापत झाली. ऑक्टोबर 2024 मध्ये, गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याने बंदूक साफ करताना चुकून स्वतःच्या पायावर गोळी झाडली होती. तो विमानतळावर जाण्याच्या तयारीत असताना, मुंबईतील त्याच्या निवासस्थानी चुकून गोळी सुटल्याने पायाला दुखापत झाली होती, असं पोलिसांनी सांगितलं होतं.
रुग्णालयातील बेडवरून रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिपमधून गोविंदाने त्याच्या चाहत्यांशी संवाद साधत तो रिकव्हर होत असल्याची माहिी दिली होती. त्याने त्याच्या समर्थकांचे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते.
“नमस्कार, प्रणाम, मी गोविंदा आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, माझ्या पालकांच्या आणि गुरुंच्या कृपेने, मला लागलेली गोळी काढून टाकण्यात आली आहे. मी येथील डॉक्टरांचे, आदरणीय डॉक्टर अग्रवालजींचे आणि तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांचे आभार मानतो. धन्यवाद, प्रणाम,” असं अभिनेत्याने म्हटलं होतं.
दरम्यान, शशी यांनी गोविंदा पुनरागमन करण्यासाठी चांगल्या पटकथेच्या शोधात असल्याचं म्हटलं आहे. “एक काळ असा होता की गोविंदाने एका वर्षात करोडो रुपयांचे प्रोजेक्ट सोडले. आज, जर त्याला एखादी पटकथा आवडत नसेल तर ठीक आहे,” असं तो म्हणाला.
“ती वेगळी गोष्ट आहे. अलीकडच्या काळात एकही हिट चित्रपट दिलेला नसतानाही, अनेक निर्माते आणि अगदी अभिनेतेही त्याला ऑफर्स घेऊन संपर्क साधत आहेत. तो फक्त योग्य संधीची वाट पाहत आहे,” असं सिन्हा म्हणाले.































