IND vs PAK: T20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. या स्पर्धेतील सर्वात जास्त चर्चेत असलेला सामना म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत. मात्र हा हाय-वोल्टेज सामना होणार की नाही, याबाबत सध्या मोठी अनिश्चितता आहे. पाकिस्तानने 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तान आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास हा सामना अधिकृतपणे रद्द होऊ शकतो. अशा परिस्थितीत भारताला पूर्ण 2 गुण मिळतील का, हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.
भारताला 2 गुण मिळण्यासाठी काय करावे लागेल?
ICC च्या नियमांनुसार, जर एखादा संघ सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला नाही, तर त्या संघाला पराभूत घोषित केले जाते. मात्र भारताला या सामन्यातून पूर्ण 2 गुण मिळवायचे असतील, तर काही अटी पूर्ण करणे गरजेचे आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला वेळेत कोलंबोला पोहोचावे लागेल आणि ठरलेल्या वेळेला मैदानावर उपस्थित राहावे लागेल. टॉसच्या वेळी भारतीय कर्णधार मैदानात हजर असणे अनिवार्य आहे. जर पाकिस्तानचा कर्णधार टॉससाठी उपस्थित राहिला नाही, तर सामना अधिकाऱ्यांकडून भारताला विजेता घोषित केले जाईल आणि भारताच्या खात्यात थेट 2 गुण जमा होतील.
भारत कोलंबोला गेला नाही तर काय?
जर भारतीय संघाला आधीच माहिती असताना की सामना होणार नाही, तरीही भारताने श्रीलंकेचा दौरा टाळला, तर परिस्थिती बदलू शकते. अशावेळी सामना अधिकाऱ्यांकडून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिला जाऊ शकतो. त्यामुळे पूर्ण 2 गुण मिळवण्यासाठी भारताचा कोलंबोला जाणे आणि मैदानावर हजर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
याच कारणामुळे भारतीय संघ नियोजित वेळापत्रकानुसार कोलंबोला जाणार असल्याचे समजते. संघ सराव सत्रात सहभागी होईल आणि सामन्यापूर्वी माध्यमांशी संवादही साधेल.
ICC पाकिस्तानवर कारवाई करणार?
या प्रकरणात ICC ने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. ICC च्या मते, असा बहिष्कार खेळाच्या आत्म्याच्या विरोधात आहे. सध्या कोणतीही अधिकृत शिक्षा जाहीर करण्यात आलेली नसली, तरी पाकिस्तानला भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असे संकेत देण्यात आले आहेत.
नेट रनरेटवरही होणार परिणाम
भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा निर्णय पाकिस्तानसाठी मोठा फटका ठरू शकतो. सामना गमावल्यास पाकिस्तानचा नेट रनरेट मोठ्या प्रमाणात घसरण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम पुढील टप्प्यातील पात्रतेवर होऊ शकतो.
आता सर्वांचे लक्ष ICC आणि PCB कडे लागले आहे. पाकिस्तान आपल्या निर्णयावर ठाम राहतो की शेवटच्या क्षणी माघार घेतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.































