ऑटो बातम्या: भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास अनेकांचीच पसंती असते ती म्हणजे एसयुव्ही कारना. मात्र एसयुव्ही कारची चलती असतानाही कारी कार मात्र आजही कालबाह्य झालेल्या नाहीत. लोकप्रियता अबाधित ठेवणाऱ्या या आहेत, ‘सेडान कार’. सहसा सेडान कार आरामदायी प्रवास, कार चालवण्याचा उत्तम अनुभव आणि दूरवरच्या प्रवासातही देणाऱ्या सहजतेसाठी ओळखल्या जातात.
कुटुंबाच्या त्यातही चौघं, पाचजणांच्या प्रवासासाठी या कार उत्तम असून, आकारात त्या तुलनेनं लहान असल्यानं शहरी आणि खेडोपाडीच्या रस्त्यांवरही सहजपणे पुढं जातात. महत्त्वाची बाब म्हणजे, या कारच्या किमती बहुतांशी खिशाला परवडणाऱ्या असल्यानं त्यांना अनेकांची पसंती असते. इतकंच नव्हे, तर या कार उत्तम मायलेजही देत असल्यानं बड्या कार उत्पादक कंपन्यासुद्धा सेडान कारनिर्मितीला प्राधान्य देतात. अशाच सेडान कारच्या शोधात असणाऱ्यांसाठी हे आहेत काही उत्तम पर्याय…
टाटा टिगोर
टाटा टिगॉर ही भारतातील सर्वात स्वस्त सेडान कारपैकी एक असून, या कारची प्रारंभी एक्स शोरुम किंमत आहे 5.49 लाख रुपये. पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध असून तिचं पेट्रोल वर्जन 19.2 kmpl आणि सीएनजी व्हेरिएंट 26 km/kg इतकं मायलेज देते. सुरक्षिततेच्या बाबतीत ही कार एक उत्तम पर्याय असून Global NCAPकडून कारला 4 स्टार रेटिंग देण्यात आले आहेत. उत्तम बॉडी स्ट्रक्चर, एअरबॅग, एबीएस असे फिचरसुद्धा या कारमध्ये आहेत.
मारुती डिझायर
मारुती डिझायर ही भारतातील सर्वाधिक खप होणारी सेडान कार आहे. या कारची प्रारंभी किंमत एक्स शोरुम 6.26 लाख रुपये इतकी आहे. पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणारी ही कार अनुक्रमे 25.71 kmpl आणि 33.73 km/kg इतकं मायलेज देते. 6 एअरबॅग, टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, सनरुफ, 360 डिग्री कॅमेरा असे मॉडर्न फिचर या कारला मिळतात. इतकंच नव्हे, तर सुरक्षिततेच्या बाबतीतही या कारला 5 स्टार रेटिंग मिळालं आहे.
ह्युंदाई ऑरा
एक्स शोरुम किंमत 5.98 लाख रुपये असणारी सेडान कार म्हणजे ह्युंडई ऑरा. पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध आहे. जिचं पेट्रोल व्हेरिएंट 20.5 किमी प्रतिलीटर आणि सीएनजी व्हेरिएंट 25 किमी प्रति किलो इतकं मायलेज देते. या कारचे दोन्ही व्हेरिएंट 6 एअरबॅगसह उपलब्ध असून त्याशिवाय टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, वायरलेस चार्जिंग, क्रूज कंट्रोल असे फिचर आरामदायी प्रवासाची मुभा देतात.





























